बेळगाव: बेळगाव आणि सीमाभागातील कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात मराठा बांधवांतर्फे १ नोव्हेंबरला करण्यात येणाऱ्या काळा दिवस आंदोलनाला गुरुवारी गालबोट लागले. दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीने रॅलीचे आयोजन केले होते.
मात्र, पोलिसांनी यंदा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून काढण्यात आलेल्या सायकल रॅलीवर लाठीमार केला. या घटनेनंतर राज्यभरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या प्रकरणाकडे लक्ष दयावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी कर्नाटक राज्याची निर्मिती होऊन बेळगाव, गुलबर्गा, बिदर, भालकी, निपाणी आदी मराठी भाषिक भाग आणि ८१४ गावे कर्नाटकमध्ये टाकण्यात आली. तेव्हापासून बेळगाव परिसरातील या भागात एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो.
आजही बेळगावमध्ये काळा दिन पाळून सायकल रॅली काढण्यात आली. कर्नाटक सरकारने नेहमीप्रमाणे या रॅलीला परवानगी लवकर दिली नाही. अखेर शेवटच्या टप्प्यात जाचक अटी आणि शर्तीवर महाराष्ट्र एकीकरण समितीला परवानगी मिळाली.