बंगळुरू: काँग्रेस आणि सेक्युलर जनता दलाच्या (जेडीएस) आमदारांच्या बंडखोरीमुळे कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर गुरुवारी कर्नाटकमधील राजकारणाने आणखी एक वळण घेतले.
कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष केआर रमेश यांनी तीन आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली. यामध्ये काँग्रेसच्या दोन आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे. रमेश जारकीहोली, महेश कुमाथल्ली आणि आणि आर. शंकर अशी या आमदारांची नावे आहेत.
विधानसभा अध्यक्षांनी या तिघांविरोधात पक्षबदल कायद्यातंर्गत (अँटी डिफेक्शन) कारवाई केली आहे. लवकरच अन्य बंडखोर आमदारांबाबतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
Karnataka assembly speaker KR Ramesh Kumar: Independent MLA R Shankar has been disqualified pic.twitter.com/A2HtmhVVio
— ANI (@ANI) July 25, 2019
केआर रमेश यांनी म्हटले की, हे प्रकरण गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे मला घाईघाईत निर्णय घ्यायचे नाहीत. माझ्याकडे १७ याचिका आल्या आहेत. यामध्ये दोन याचिका अपात्रतेसंबंधी आणि इतर याचिका राजीनाम्याच्या होत्या.
अपात्रतेची कारवाई झालेले आर. शंकर हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर २५ जून रोजी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ८ जुलैला शंकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी भाजपला समर्थन दिल्याचे जाहीर केले. यावर सिद्धरामय्या यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केल्याचे केआर रमेश यांनी सांगितले.