Indian Railways : प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) सातत्यानं काही महत्त्वाचे बदल आणि नव्या सुविधा प्रवाशांपर्यंत पोहोचवल्या जातात. प्रवास लांब पल्ल्याचा असो किंवा कमी अंतराचा. तो सुखकर कसा होईल याचाच विचार करत रेल्वे विभागाकडून प्रवाशांसाठी काही गोष्टींची व्यवस्था केलेली असते. याच रेल्वेनं प्रवास करतान प्रवासी मात्र सातत्यानं चुका करताना दिसतात. बरं, या चुकांची पुनरावृत्तीही बऱ्याचदा होते आणि याच चुकांमुळं रेल्वे विभागाला मात्र फायदा होतोय. अर्थात त्याआधी भुर्दंडही सोसावा लागतोय.
यातलीच सर्वात मोठी चूक म्हणजे बिनातिकीट प्रवास करण्याची. आजमितिस कैक प्रवाशांनी रेल्वेतून विना तिकीट प्रवास केला आहे. फक्त लोकलच नव्हे तर हॉलिडे स्पेशल ट्रेन, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधूनही असंख्य प्रवासी मोफत प्रवास करताना दिसतात. अशा सर्व प्रवाशांवर आळा घालण्यासाठी आता रेल्वे विभाग कठोर कारवाई करताना दिसत आहे. ज्याअंतर्गत प्रवाशांच्या तिकीटाची पडताळणी करण्याचं अभियान रेल्वेनं हाती घेतलं आहे.
रेल्वे विभागाकडून समोर आलेल्या माहितीनुसार वाणिज्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली एप्रिल ते मे 2023 या दोन महिन्यांमध्ये तिकीट तपासणीची बरीच अभियानं राबवण्यात आली. ज्यामधून 36.75 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम जमा करण्यात आली. या रकमेमध्ये मुंबई उपनगरीय विभागातील 9.75 कोटी रुपयांचाही समावेश आहे.
रेल्वे विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2.72 लाख अनियमित प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचं आढळलं असून, त्यांच्याकडून तब्बल 19.99 कोटी रुपये इतकी दंडाची रक्कम आकारली गेली. तर, पश्चिम उपनगरीय रेल्वेमधून 79500 प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकजून 5.04 कोटी रुपये इतकी दंडात्मक रक्कम आकारली गेली.
एसी लोकलमध्ये मे महिन्यात असे साधारण 12800 प्रवासी आढळले. ज्यांच्याकडून दंड म्हणून 42.80 लाख रुपये इतकी रक्कम आकारली गेली. लक्षणीय बाब म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल 203.12 टक्क्यांनी जास्त आहे. आता राहिला मुद्दा हा, की तुम्हीही रेल्वेनं विनातिकीट प्रवास करताय का? करत असाल तर आताच थांबा. कारण, पाच- दहा रुपयांच्या तिकीटाऐवजी कारवाई झाल्यात तुम्हाला दहापट किंवा त्याहूनही जास्त रक्कम दंड स्वरुपात भरावी लागेल.