Railway News : लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने खुशखबर दिली आहे. ट्रेनमध्ये आता प्रवाशांसाठी पुन्हा जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. ट्रेनमध्ये प्रवाशांना शिजवलेलं अन्न दिलं जाणार आहे. रेल्वे बोर्डाने शुक्रवारी एका पत्रात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ला सेवा पुन्हा सुरू करण्यास सांगितलं आहे.
रेल्वे बोर्डाने स्पष्ट केलं आहे की प्रवाशांना 'रेडी टू इट' जेवण दिलं जाणार आहे. पत्रात म्हटले आहे की, 'सामान्य रेल्वे सेवा पुन्हा सुरू करणे, प्रवाशांच्या गरजा आणि देशभरात कोविड लॉकडाऊन निर्बंध शिथिल केल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रेनमध्ये शिजवलेलं अन्न देण्याची सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोव्हिड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने या सेवेवर बंदी घातली होती. याशिवाय प्लॅटफॉर्म तिकीटही महाग करण्यात आलं होतं. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या वाढीव दराचा उद्देश रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी रोखणे हा होता.
जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना किंवा रेल्वे स्टेशनवर शाकाहारी जेवण घेतलं तर त्याच्या शुद्धतेचीही पूर्ण खात्री असेल. खाद्यपदार्थ तयार करण्यापासून ते प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेत शुद्धतेची पूर्ण काळजी घेतली जाईल. यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) सात्विक कौन्सिल ऑफ इंडियासोबत मिळून काम करत आहे.
याशिवाय ट्रेनचं तिकीट 15 टक्क्यांपर्यंत स्वस्त होऊ शकतं. गेल्या आठवड्यात, भारतीय रेल्वेने विशेष गाड्या नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, गाड्या नियमित केल्यामुळे भाडंही कमी होईल.