...तर आणखीन मलिक, सल्लाउद्दीन तयार होतील - मेहबुबा

१९८७ सालच्या निवडणुकीत झालेल्या घटनाचा हवाला

Updated: Jul 13, 2018, 12:59 PM IST
 ...तर आणखीन मलिक, सल्लाउद्दीन तयार होतील - मेहबुबा  title=

नवी दिल्ली : दिल्लीनं पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, तर काश्मीरमध्ये गावागावात यासिन मलिक आणि सय्यद सल्लाद्दीन तयार होतील असा इशारा जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींनी दिलाय. स्थानिक स्तरावर पक्ष फुटणं शक्य नाही... त्यामुळे दिल्लीतून म्हणजेच भाजप पक्ष फोडण्याचे प्रयत्न करत आहे, असा आरोप मुफ्तींनी केलाय. त्यासाठी १९८७ सालच्या निवडणुकीत झालेल्या घटनाचा हवाला दिलाय. 

१९८७ साली निवडणुकीच्या वेळी असे प्रकार झाले... दिल्लीनं १९८७ सारखंच लोकांकडून मतदानाचा अधिकार हिसकावून घेतला किंवा फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर आत्ताही यासिन मलिक आणि हिजबुल मुजाहिदनचा प्रमुख सय्यद सल्लाउद्दीन तयार होतील. यंदाही लोकांच्या हक्कावर दरोडा पडला, तर परिस्थिती आणखी बिघडेल असंही मुफ्तींनी म्हटलंय. 

श्रीनगरमध्ये आयोजित शहीद दिवसाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुफ्तींच्या या विधानानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. 

उल्लेखनीय म्हणजे, भाजपनं पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) सोबत गेलेल तीन वर्ष जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केलं होतं. या काळात मेहबुबा मुफ्ती याच मुख्यमंत्री होत्या. १९ जून रोजी दहशतवादी कारवाया रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचं सांगत भाजपानं पीडीपीला दिलेलं समर्थन मागे घेतलं. तेव्हापासून राज्यात राज्यपाल शासन लागू आहे. नुकतंच पीडीपीच्या सहा आमदारांनी पक्षाशी फारकत घेतलीय. या आमदारांमध्ये जावेद बेग, यासिर रेशी, अब्दुल मजीद, इमरान अन्सारी, अबीद हुसैन अन्सारी आणि मोहम्मद अब्बास वानी यांचा समावेश आहे.