Viral Video: आपल्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आपलं घऱ स्वच्छ ठेवताना, आजुबाजूचा परिसर, शहर तितकंच स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपली असते. पण अनेक नागरिक बेजबाबदारपणे वागत सर्रासपणे शहरात घाण करत असतात. गुटखा, पान खात फूटपाथ, रेल्वे स्थानकांच्या भिंती रंगवल्या जातात. यामध्ये सुशिक्षित नागरिकांचाही समावेश असतो. प्रशासनावर तर 'येथे थुंकू नये' असं सांगण्याची वेळ आली आहे. पण तरीही काही नागरिक मात्र सुधरत नाहीत. दरम्यान आयएएस अधिकाऱ्याने अशा लोकांची घाण स्वच्छ करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर करत नागरिकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडीओत एक महिला स्वच्छता कर्मचारी साफसफाई करताना दिसत आहे. रेल्वे प्रशाशांनी पान, गुटखा खाऊ घाण केलेल्या खांबावरील घाण काढताना तिला किती कष्ट करावे लागत आहेत हे यातून दिसत आहे. प्रशासन वारंवार प्रयत्न करुनही सार्वजनिक ठिकाणांची अस्वच्छता हा डोकेदुखीचा विषय आहे. त्यामुळे अशा प्रकारची अवस्था आता नागरिकांनाही सवयीची झाली आहे.
व्हिडीओत दिसणारी महिला आपलं कर्तव्य पार पडताना संताप व्यक्त करताना दिसत आहे. लोकांना सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका असं वारंवार सांगूनही ते ऐकत नाहीत अशी हतबलता तिने मांडली आहे. महिलेच्या बोलण्यातून लोकांकडून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांची होणारी अवहेलना प्रकर्षाने जाणवत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अधिकाऱ्याने लिहिलं आहे की, 'या काकींचा संदेश योग्य लोकांपर्यंत पोहोचवा'.
कृपया आंटी के संदेश को ‘सही लोगों’ तक पहुँचायें. pic.twitter.com/0yJ07hP9ve
— Awanish Sharan (@AwanishSharan) March 27, 2024
या व्हिडीओच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणांचा अनादर करणाऱ्यांध्ये जनजागृती करण्याचा, तसंच स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती आदर दाखवण्याचा अवनीश शरण यांचा प्रयत्न आहे.
अवनीश शरण यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. 'तुमच्या मेहनतीसाठी आभार, ज्या फक्त प्रामाणिकपणे काम करत नाही आहेत तर तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांना कठोर संदेशही देत आहेत', असं एका युजरने म्हटलं आहे. अनेक युजर्सनी तर गुटख्यावर बंदी आणली जावी असा सल्लाच दिला आहे.