नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्र संघाकडून दिला जाणारा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आज दिल्लीत देण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुतरेस यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. मोदींसोबत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रोन यांना देखील याच पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
२६ सप्टेंबरला या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय सौर उर्जा संघटनेच्या स्थापनेत मोदी आणि मॅक्रोन यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे. याशिवाय मोदी सरकारनं भारत २०२२ पर्यंत प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठीही मोदींना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या 'चॅम्पियन्स ऑफ अर्थ' या पुरस्काराने मोदींचा गौरव केला जाणार आहे. पॉलिटिकल लीडरशीप या विभागात त्यांना हा पुरस्कार मिळणार आहे. दुसरीकडे केरळमधील कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळालाही पुरस्कार देण्यात येणार आहे. अक्षय उर्जेच्या दिशेने पावले टाकल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे.