मुंबई : दोन दिवस धो-धो पाऊस कोसळत असल्याने उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) जवळपास सर्वच नद्यांना पूर आला आहे. तर अलकनंदा (Alaknanda), मंदाकिनी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी कधीही परिसरात घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसाने उत्तराखंडला पुन्हा धोका निर्माण झाला आहे. अलकनंदा, मंदाकिनी इत्यादी नद्यांना पूर आला आहे. अलकनंदा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा उत्तराखंडमध्ये हाहाकार निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने रुद्रप्रयाग आणि श्रीनगरमधील नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच परिसरात पाऊस कोसळत आहे. दुसरीकडे ऋषिकेशमधील गंगेची वाढती पाण्याची पातळी पाहून प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढच्या 72 तासांसाठी नैनीताल, रुद्रप्रयाग, चमोली, पिथौरागड इत्यादी जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देखील जारी केला आहे. नद्या दुथडी वाहत असल्याने राज्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
#WATCH | Uttarakhand: Several low lying areas in Srinagar, Pauri Garhwal submerged in water after the water level rose in Alaknanda river due to heavy rainfall pic.twitter.com/Kk8HLJ1MU7
— ANI (@ANI) June 19, 2021
पावसामुळे रुद्रप्रयागमधील अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्यांच्या पाण्याने धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. अलकनंदाची पाण्याची पातळी 627 मीटरच्या वर पोहोचली आहे तर मंदाकिनीची पातळी 626 मीटर वर आहे. नद्यांची वाढती पाण्याची पातळी पाहून प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.
डोंगराचा काही भाग खाली आल्याने दरडीमुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गासह अनेक मार्गांवर वाहतूक बंद आहे. दुसरीकडे, हेलंग-उरगाम रस्ताही हेलंग हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प जवळपास 20 मीटरपासून भूस्खलनामुळे खराब झाला आहे, त्यामुळे ग्रामस्थांचा दळणवळणाचा संपर्क तुटला आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे हे मार्ग सुरु करण्यात अडचण निर्माण होत आहे.