रामराजे शिंदे, झी २४ तास, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा कार्यकाळ आजपासून सुरू होतोय. आज संध्याकाळी ७ वाजता मोदी पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. देशविदेशातले पाहुणे या शपथविधीसाठी दाखल झालेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. यासाठीची लगबग दिल्लीत सुरू आहे. मोदींबरोबर ६५ ते ७० मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यात ३५ टक्के तरूण चेहरे तर महिलांनाही प्रतिनिधित्व मिळणार आहे. मंत्रिमंडळात प्रादेशिक समतोल राखला जाईल. पश्चिम बंगाल, ओडिशामधली पक्षाची कामगिरी पाहता या राज्यांना मंत्रिमंडळात झुकतं माप दिलं जाईल.
मोदींच्या शपथविधीची ‘शेजारी देश प्रथम’ ही संकल्पना असणार आहे... त्यासाठी ‘बिम्सटेक’ देशांना आमंत्रण देण्यात आलंय. बिम्सटेक म्हणजे ‘बे ऑफ बंगाल इनीशिएटिव फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल एंड इकोनॉमिक कॉर्पोरेशन'... बंगालच्या खाडीजवळच्या देशांची ही एक आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य संघटना आहे.
बांग्लादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूटान, नेपाल, किर्गिस्तान आणि मॉरिशिअस या देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रण पाठवण्यात आलंय. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित राहणार नाहीत, पण त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.
चीन समुद्रात घुसखोरी करतोय. त्यामुळे समुद्रात आर्थिक ताकद वाढविण्यासाठी मोदींचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर या देशांना सोबत घेऊन समुद्र मार्ग आणखी सुरक्षित करणे हा प्रयत्न असेल. तसेच आर्थिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्राधान्य दिले आहे.
राष्ट्रपती भवनाच्या फोर कोर्टमध्ये शपथविधी होईल. क्रीडा, साहित्य, आर्थिक क्षेत्रातल्या मान्यवरांना आणि धर्मगुरूंना निमंत्रण पाठवण्यात आलंय. उद्योग जगतातून अनिल आणि मुकेश अंबानी, रतन टाटा आणि अदानी ग्रुपला आमंत्रण देण्यात आलंय. हालिवूड, बॉलिवूडमधले कलाकार, दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतले प्रमुख कलाकार आणि दिग्दर्शक आणि भोजपुरी चित्रपटातले कलाकारही उपस्थित राहतील.
सरसंघचालक मोहन भागवत, योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह पद्म पुरस्कार सन्मानार्थी, वैज्ञानिक, माजी सैन्याधिकारी, विविध भाषांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, एनआरआयदेखील मोदींच्या शपथविधीला उपस्थित असतील