रमजानमध्ये मुस्लिमांना लवकर घरी जाण्याची सूट, राज्य सरकारचा आदेश; BJP म्हणते, 'नवरात्रीत..'

Early Leave for Muslim Employees: मुस्लिम कर्मचाऱ्यांना ही विशेष सूट देण्यासंदर्भातील आदेश सरकारकडून जारी करण्यात आल्यानंतर वादाला फुटलं तोंड.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 19, 2025, 10:32 AM IST
रमजानमध्ये मुस्लिमांना लवकर घरी जाण्याची सूट, राज्य  सरकारचा आदेश; BJP म्हणते, 'नवरात्रीत..'
या निर्णयावरुन निर्माण झाला वाद (प्रातिनिधिक फोटो)

Early Leave for Muslim Employees: इस्लाममध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजानच्या महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूट देण्याचा निर्णय भारतामधील एका राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र या निर्णयावरुन नवीन वादाला तोंड फुटलं असून भारतीय जनता पार्टीने कठोर शब्दांमध्ये निर्णयाला विरोध केला आहे. नेमकं आदेशात काय म्हटलंय आणि यावर भाजपाचं म्हणणं काय आहे पाहूयात...

कुठे देण्यात आली आहे ही सूट?

रमजानचा महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूट देण्याचा निर्णय तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला आहे. तेलंगणाच्या मुख्य सचिवांनी या संदर्भातील आदेश जारी केला आहे. राज्यातील मुस्लिम कर्मचाऱ्यांना रमजान महिन्यात कार्यालय किंवा शाळा एक तास आधी सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे, असं या आदेशात म्हटलं आहे.

किती दिवस आणि कोणाला मिळणार ही सूट?

सरकारकडून मुस्लिम कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली ही सूट 2 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीत असणार आहे. तेलंगण सरकारचा सदर आदेश सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर कंत्राटी, आऊटसोर्सिंग, बोर्ड आणि सार्वजनिक क्षेत्रातील मुस्लिम कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे. मात्र, तेलंगणा सरकारने धर्माच्या आधारावर घेतलेल्या या निर्णयावरुन भाजपाच्या नेत्यांनी घणाघाती टीका केली आहे.

नक्की वाचा >> 'महाकुंभ बनला मृत्युकुंभ! मी पवित्र गंगा मातेचा...', ममता बॅनर्जींच्या विधानाने नवा वाद

भारतीय जनता पार्टीची सडकून टीका

तेलंगणा सरकारच्या या निर्णयावर भाजपाचे नेते टीका करत आहेत. सदर निर्णयावरुन काँग्रेस आणि भाजपाचे नेते एकमेकांवर टीका करत असल्यामुळे या आदेशावरुन सध्या तेलंगणमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तेलंगणा सरकारच्या या निर्णयावर भाजपाने तिखट शब्दांत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

नवरात्रीच्या उपवासाचा केला उल्लेख

तेलंगण सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे काँग्रेसकडून भेदभाव करण्याचा प्रयत्न आहे, असं भाजपाने म्हटलं आहे. आपलं मत मांडताना भाजपाच्या नेत्यांनी, नवरात्रीत उपवास असताना हिंदूंना अशी कोणतीही सूट दिली जात नाही, असं म्हणत आपला आक्षेप मांडला आहे.