सोन्यानंतर आता चांदीमध्येदेखील....' ग्राहकांसाठी केंद्र सरकार महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

Silver Hallmarking: सोन्यासाठी HUID नंतर आता चांदीच्या हॉलमार्किंगवरदेखील विचार सुरु आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 25, 2024, 06:36 AM IST
सोन्यानंतर आता चांदीमध्येदेखील....' ग्राहकांसाठी केंद्र सरकार महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत title=
चांदी हॉलमार्किंग

Silver Hallmarking: सणासुदीच्या दिवसात बहुतांश जणांची सोने-चांदी खरेदीची लगबग पाहायला मिळते. भलेही सोनं-चांदी कितीही महाग झाली तरी भविष्याचा विचार करुन गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून यात गुंतवणूक केली जाते. सोने चांदी खरेदी करताना त्यातील गुणवत्ता हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सरकार वेळोवेळी कायदे अधिक कडक करत असते. चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर येत आहे. 

तुम्ही चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण सोन्यानंतर आता चांदीमध्येदेखील हॉलमार्किंग असणार आहे. चांदीची हॉलमार्किंग करण्यासंदर्भात विचार सुरु आहे. सोन्यावर हॉलमार्क यूनीक आयडेंटिफिकेशन नंबप (HUID) अनिवार्य आहे. भारतीय मानक ब्यूरो (BIS) ने एप्रिल 2023 पासून हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांसाठी 6 अंकांचा 'अल्फान्यूमेरिक' HUID अनिवार्य केला आहे. यानंतर आता केवळ 6 अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंगच गृहीत धरला जातो. याच्या व्यतिरिक्त सोन्याची विक्री करता येत नाही. 

सोन्यासाठी HUID नंतर आता चांदीच्या हॉलमार्किंगवरदेखील विचार सुरु आहे. इतर मुद्द्यांव्यतिरिक्त चांदीप्रमाणे HUID चे टिकाऊपण हे सध्या महत्वाचा मुद्दा आहे. सोन्याच्या पृष्ठभागावरील HUID चा टिकाऊपणामुळे ग्राहकांना भविष्यात नुकसान होत नाही. याउलट, चांदीच्या पृष्ठभागावर नक्षीदार HUID वातावरणाशी प्रतिक्रिया होऊन ऱ्हासास कारणीभूत ठरु शकतो. त्यामुळे चांदीच्या पृष्ठभागावरील HUID ला वातावरणातून निष्क्रिय करण्याच्या विविध मार्गांवर विचार केला जात आहे. 

सोन्याची शुद्धता प्रमाणित करण्याच्या प्रक्रियेला गोल्ड हॉलमार्किंग म्हणतात.गोल्ड हॉलमार्किंग हे सोन्याला त्याचे गुणवत्ता प्रमाणपत्र दिल्यासारखे आहे. सरकारने सोन्याच्या शुद्धतेचे मापदंड ठरवून दिले आहेत. त्यानुसार बाजारात सोने उपलब्ध आहे. हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये BIS लोगो, शुद्धता ग्रेड आणि 6 अंकी अल्फान्यूमेरिक कोड दिसू शकतात.

हॉलमार्क खरा आहे की नाही हे कसे ओळखावे?
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने तयार केलेल्या BIS केअर ॲपच्या मदतीने तुम्ही दागिने देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करावे लागेल. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, फोन नंबर आणि ईमेल आयडी द्यावा लागेल आणि तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी ओटीटीद्वारे व्हेरिफाय करावे लागेल. यानंतर तुम्ही ॲप वापरू शकता. तपासण्यासाठी, HUID व्हेरिफिकेशन करा आणि दागिन्यांचा HUID क्रमांक सबमिट करा. जर दागिने अस्सल असतील तर त्याची शुद्धता, उत्पादनाचे नाव इत्यादी सर्व तपशील तुम्हाला ॲपमध्ये दिसतील.