सोन्याचे भाव येत्या वर्षभरात मोडणार आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड

सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्यास सुरुवात

शैलेश मुसळे | Updated: Jun 26, 2019, 02:50 PM IST
सोन्याचे भाव येत्या वर्षभरात मोडणार आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सरळ परिणाम इतर गोष्टींवर देखील होतो. अमेरिका-इराणमध्ये सुरु असलेल्या तणावामुळे सोन्यावर याचा सरळ परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील मुख्य बँका आणि अमेरिका सरकारमधील तणावामुळे लोकं आता सोन्य़ामध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे सोनं महागण्याची शक्यता आहे.

मंगळवारी सोन्याच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 34647 रुपयांवर पोहोचला. एका मोठ्या काळानंतर सोन्याच्या भावात इतकी वाढ पाहायला मिळाली. ऑक्टोबरपर्यंत सोनं 35,100 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. कारण वर्षाच्या शेवटपर्यंत सोनं 37,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

आयबीजेएचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी म्हटलं की, 'सध्या सोनं 1424-1425 डॉलर प्रति औंसवर ट्रेड होत आहे. पण आता सोनं 1500 डॉलरच्या वर जाण्याची शक्यता आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाचा सरळ परिणाम सोन्याच्या किंमतीवर होणार आहे.'

मेहता यांच्यानुसार, 'सोनं यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात 1490 ते 1505 डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. भारतात यामुळे सोनं 37,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचण्याची शक्यता आहे. जर सोनं 1500 डॉलरच्या वर पोहोचलं तर त्यानंतर आणखी 10 टक्के वाढ पुढच्या वर्षात होऊ शकते. त्यामुळे 2020 मध्ये सोनं हे 39000 ते 41000 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.'

मोतीलाल ओसवाल कमोडिटीने येत्या वर्षभरात सोनं 42,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे.