नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात आणि स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने आज सोन्याचा भाव अचानक वाढला आहे. लग्न, सण जवळ आल्याने सोन्याची मागणी वाढली आहे. दिल्ली सर्राफा बाजारात गुरुवारी सोनं 125 रुपयांनी वाढलं. 6 वर्षाच्या सर्वात उंच स्तरावर आज सोन्याचा भाव पोहोचला आहे. सोनं 32,625 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं आहे. चांदी मात्र 130 रुपयांनी स्वस्त झाली असून 39,600 रुपये प्रति किलो झाली आहे.
बाजार सूत्रांच्या माहितीनुसार, डॉलर कमजोर आणि शेअर मार्केट घसरल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं महागलं. स्थानिक मुद्रा देखील घसरल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याबाबतीत कल वाढला आहे. सिंगापूरमध्ये सोनं 1,234.20 डॉलर प्रति औंस झालं आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 125 रुपयांनी वाढून अनुक्रमे 32,625 रुपये आणि 32,475 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं आहे. 29 नोव्हेंबर 2012नंतर सोनं सर्वात महाग झालं आहे. 23 ऑक्टोबर पासून यामध्ये 405 रुपयांची वाढ झाली आहे.
दूसरीकडे चांदी मात्र स्वस्त झाली आहे. चांदी 130 रुपयांनी स्वस्त झाली आहे. चांदी 39,600 रुपये प्रति किलो झाली आहे.