नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दिल्ली विधानसभेत ७० सदस्य असून मतदान ८ फेब्रुवारी तर निकाल ११ फेब्रुवारीला होणार आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाने सर्व ७० उमेदवारांची यादी याआधीच जाहीर केली आहे. दिल्लीत भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तर 'आप'ने विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. तर भाजपने राष्ट्रीय मुद्दे उचलून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुढे करुन ही निवडणूक लढवत आहे. भाजपने आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मोदी विरुद्ध केजरीवाल असाच प्रचार या निवडणुकीत दिसून येणार आहे.
दिल्ली विधानसभेची यादी भाजप नेते आणि खासदार मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषदेत घोषित केली. यावेळी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकरही उपस्थित होते. सर्व उमेदवारांची नावे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने ठरविली आहेत, असे तिवारी यांनी स्पष्ट केले. भाजपचा प्रचार दोन दिवसात सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, 'आप'ने आपला प्रचार सुरु केला आहे. केलेली विकास कामे घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र, भाजप अजूनही चाचपड असल्याचे दिसून येत आहे.
Bharatiya Janata Party announces names of 57 candidates out of 70 for upcoming Delhi assembly elections. pic.twitter.com/eJEYYPm5X3
— ANI (@ANI) January 17, 2020
सध्या दिल्ली विधानसभेवर आम आदमी पक्षाचे एकहाती सत्ता आहे. पक्षाला ७० पैकी ६७ जागा मिळालेल्या आहेत. भाजपला केवळ तीन जागा मिळाल्यात. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांना पुन्हा रोहिणीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दिवंगत भाजप नेत्या आणि माजी मंत्री सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मैदानात उतरविण्याची तयारी भाजपने केली आहे. केजरीवाल यांची लोकप्रियता आणि काम यामुळे भाजपला ही निवडणूक सोपी जाणार नाही, असेच दिसून येत आहे.