श्रीरामानेही सीतेला सोडले होते; तिहेरी तलाकवर काँग्रेस नेत्याचा प्रतिवाद

केवळ मुस्लिमच नव्हे तर हिंदू, ख्रिश्चन आणि शीख धर्माच्या महिलांनाही अशाप्रकारच्या अन्यायाला सामोरे जावे लागते.

Updated: Aug 10, 2018, 11:25 AM IST
श्रीरामानेही सीतेला सोडले होते; तिहेरी तलाकवर काँग्रेस नेत्याचा प्रतिवाद title=

नवी दिल्ली: मोदी सरकारकडून शुक्रवारी बहुचर्चित तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच जुजबी सुधारणांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजूरी दिली होती. आज या विधेयकावरुन राज्यसभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. 

या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वच धर्मांमध्ये महिलांना अयोग्य पद्धतीने वागवले जाते. केवळ मुस्लिमच नव्हे तर हिंदू, ख्रिश्चन आणि शीख धर्माच्या महिलांनाही अशाप्रकारच्या अन्यायाला सामोरे जावे लागते. आपल्या देशातील प्रत्येक समाजात पुरुषांचे वर्चस्व आहे. एवढेच काय, श्रीरामानेही एकेकाळी संशयामुळे सीतेला सोडून दिले होते. त्यामुळे आपल्याला व्यापक बदलाची गरज असल्याचे दलवाई यांनी सांगितले. 

दरम्यान, आज तिहेरी तलाक विधेयकावर काँग्रेस नेत्यांकडून मतं मांडली जाण्याची शक्यता आहे. संसदेत येण्यापूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. त्यामुळे आज राज्यसभेत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.