अरावकुरिची, तामिळनाडू : कमल हासनच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या 'मक्कल निधी मैयम'च्या एका सभेत गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न झाला. दोन अज्ञातांनी मंचावर कथित रुपात अंडी आणि दगडांचा मारा केला. त्यामुळे घटनास्थळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता. अरावकुरिचीमध्ये घडलेल्या या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. कमल हासन आपलं भाषण संपवून मंचावरून खाली उतरत असतानाच स्टेजवर अंडे आणि दगड फेकण्यात आले. परंतु, पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात घेत कमल हासन यांना सुरक्षित स्थळी हलवलं.
बुधवारी रात्रीही तिरुपरंकुंडरम विधानसभा मतदारसंघातही कमल हसन यांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली होती... यावेळी ते या गाडीवर उभे राहून ते एका राजकीय सभेला संबोधित करत होते. कमल हासन यांना चप्पल लागली नाही परंतु, ही कृती करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. उल्लेखनीय म्हणजे, या घटनेनंतर कोइम्बतूर जिल्हा पोलिसांनी शुक्रवारी सुलूर फेरनिवडणुकीत प्रचार करण्यासाठी कमल हासन यांना परवानगी नाकारली आहे.
काही दिवसांपूर्वी कमल हासन यांनी नथूराम गोडसे संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. स्टेजवर अंडी आणि दगड फेकल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं, 'मला वाटतं राजकारणाची पातळी खूपच खालावलीय. पण मला भीती वाटत नाही. प्रत्येक धर्मात दहशतवादी आहेत. याबद्दल आपण खोटे दावे करू शकत नाही. इतिहास साक्षी आहे की प्रत्येक धर्मात कट्टरतावादी आहेत'.
Kamal Haasan on stones thrown at his rally in Trichy: I feel the quality of polity is going down. I don't feel threatened. Every religion has their own terrorist, we cannot claim that we are sanctimonious. History shows that all religions have their extremists. #Chennai pic.twitter.com/R7buqXnUBU
— ANI (@ANI) May 17, 2019
'मला अटकेची कोणतीही भीती नाही. त्यांना मला अटक करू द्या, त्यांनी असं केलं तर त्यांच्याच समस्या वाढतील. पण ही चेतावणी नाही तर सल्ला आहे' असंही कमल हासन यांनी म्हटलंय. 'नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी आहे' असं वक्तव्य कमल हासन यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.
फिल्मी दुनियेतून राजकारण क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या कमल हासन यांनी आपल्या विरोधकांना आव्हान देत 'योग्य आरोप' करण्याचा सल्ला दिलाय.