मुंबई : उद्योग विश्वात आपल्या उत्तुंग कामगिरीने कायमच नव्या जोमाच्या उद्योजकांना आणि संपूर्ण नव्या पिढीसाठी आदर्श प्रस्थापित करणाऱ्या Ratan Tata रतन टाटा यांनी काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामच्या विश्वात पदार्पण केलं. टाटा यांनी पाहता पाहता या अनोख्या माध्यमावर फॉलोअर्सचा मोठा आकडा पार केला. अवघ्या काही महिन्यांतच १० लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवणाऱ्या टाटा यांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांचं कुतूहल, आनंद आणि सोशल मीडिया यूजर्सचे आभार मानले.
रतन टाटा यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते जमिनीवर अगदी सहजपणे बसलेले दिसत असून, त्यांच्या चेहऱ्यावर सुरेख अशी हसरी मुद्रा पाहायला मिळत आहे. हाच फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी आताच पाहिलं. माझ्या या पेजवरील फॉलोअर्सच्या आकड्याने एक मैलाचा दगड गाठला आहे. इन्स्टाग्रामवर पदार्पण करतेवेळी मी विचार केला होता त्याहून हे ऑनलाईन कुटुंब फार वेगळं आहे आणि त्यासाठी मी आभार मानलेच पाहिजेत. या काळात, या वयात तुम्ही जी काही नाती आकारास आणत आहात ते या आकड्याहूनही मोठं आहे. या एका अनोख्या समुदायाचा भाग होऊन आणि तुमच्याकडून खूप सारं शिकून मला फार आनंद होतो. मी आशा करतो की हा एकत्र प्रवास असाच सुरू राहील.' त्यांनी ही पोस्ट शेअर करताच तब्बल साडेतीन लाखांहून अधिक जणांनी ती लाईक केली. (हा आकडा अताही वाढतच आहे.)
काहींनी टाटा यांच्या पोस्टवर, अतिशय सुरेख अशा प्रतिक्रिया देत त्यांना शुभेच्छा दिल्या. तर, यातच एका महिलेने Congratulations chhot अशीच कमेंट केली. जे पाहून इतर नेटकऱ्यांही ही प्रतिक्रिया रतन टाटा यांचा अनादर करणारी असल्याचा सूर आळवला. ज्यानंतर त्या महिलेने आपल्या कमेंटचं स्पष्टीकरणही दिलं. 'ते आपल्या सर्वांसाठीच एक आदर्श आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील आदरयुक्त प्रेमापोटी मी त्यांना छोटू म्हणूच शकते', असं मत त्या महिलेने मांडलं.
हा सर्व प्रकार टाटा यांच्यापासूनही लपून राहिला नाही. 'आपल्या प्रत्येकातच एक लहान मुल दडलेलं असतं. त्यामुळे प्रत्येकानेच त्या (कमेंट करणाऱ्या) महिलेचा आदर करा', अशी प्रतिक्रिया एका हसऱ्या चेहऱ्याच्या इमोजीसह टाटा यांनी दिली. टाटा यांचं हे उत्तर, किंबहुना त्यांचा हा दृष्टीकोनच सर्वांची मनं जिंकून गेला. बस्स, मग काय इन्स्टाग्रामवर रतन टाटा पुन्हा एकदा एका नव्या कारणामुळे ट्रेंडमध्ये आले.
पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ
इतक्यावरच न थांबता टाटा यांनी त्यांच्या Insta storyमध्येही हा सर्व प्रकार मोजक्या शब्दांत मांडला. ''एका निरागस महिलेने कमेंटमध्ये मला 'छोटू' म्हणत त्यांची प्रतिक्रिया दिली. याबद्दल त्यांना निशाण्यावर घेणण्यात आलं, खिल्लीही उडवली गेली. अखेर त्यांनी ही कमेंट डिलीट केली. मी त्या महिलेने माझ्यासाठी लिहिलेली नोट सकारात्मक दृष्टीने घेतो. त्याचा आदर करतो...'', असं टाटा यांनी लिहिलं. रतन टाटा यांची पोस्ट, त्यावर आलेल्या प्रतिक्रिया आणि त्यातून समोर आलेलं हे सर्व प्रकरण पाहता, एक इतका मोठा उद्योजक परिस्थिती कशा प्रकारे हाताळत सारंकारी पूर्वपदावर आणतो, याचाच प्रत्यय या सोशल मीडियाच्या माध्यमातून आला.