Rajasthan New CM Bhajanlal Sharma: भाजपाने पुन्हा एकदा आपलं धक्कातंत्र कायम ठेवलं आहे. राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भजनलाल शर्मा पहिल्यांदाच निवडणूक जिंकत आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांची निवड अनेकांसाठी भुवया उंचावणारी ठरली आहे. दिल्लीहून आलेल्या निरीक्षकांची आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर नावाची घोषणा कऱण्यात आली.
पहिल्यांदा आमदार होऊन थेट मुख्यमंत्री! कोण आहेत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल?
भाजप हायकमांडने केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांना राजस्थानचे निरीक्षक म्हणून नियुक्त केलं होते. आज दुपारी तिन्ही नेत्यांनी जयपूरला पोहोचून आमदारांची बैठक घेतली. आज दुपारी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची वसुंधरा राजे यांच्याशी बैठक झाली. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही राजनाथ सिंह यांच्याशी फोनवर चर्चा केली.
#WATCH | BJP names Bhajanlal Sharma as the new Chief Minister of Rajasthan pic.twitter.com/j3awHnmH7k
— ANI (@ANI) December 12, 2023
भाजपाने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आधीच सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मध्य प्रदेशात पक्षाने अनेक मोठ्या चेहऱ्यांना बाजूला सारत मोहन यादव यांच्याकडे राज्याचं नेतृत्व सोपवलं, तर छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय यांची निवड करण्यात आली. राजस्थानमध्येही भाजपा अशाच धक्कातंत्राचा वापर करेल असं बोललं जात होतं. त्यामुळे वसुंधरा राजे मुख्यमंत्री होणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार यावर अनेक दावे केले जात होते. पण आमदारांच्या बैठकीत वसुंधरा राजे यांच्याकडेच भजनलाल शर्मा यांच्या नावाची चिठ्ठी सोपवत प्रस्ताव मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
कोण आहेत भजनलाल शर्मा?
भरतपूर येथील रहिवासी भजनलाल शर्मा हे दीर्घकाळापासून संस्थेत कार्यरत आहेत. प्रदेश सरचिटणीस म्हणून ते कार्यरत आहेत. जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित जागेवरून भाजपने त्यांना पहिल्यांदाच निवडणूक लढवायला लावली. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून भजनलाल शर्मा यांना उमेदवारी दिली होती. सांगानेर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भजनलाल शर्मा विजयी झाले. संघटनेतील महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं असल्याचं बोललं जात आहे.
कोण होतं मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत?
राजस्थानमधील विजयानंतर भाजपासमोर मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची निवड करायची याचं मोठं आव्हान होतं. पण आता पूर्णविराम मिळाला आहे. या यादीत वसुंधरा राजेंचं नाव होतं. याशिवाय राजस्थानमधील हिंदुत्वाचे पोस्टर बॉय बाबा बालकनाथ यांच्याही नावाची चर्चा होती. याशिवाय गजेंद्र शेखावत, सीपी जोशी, दीया कुमार आणि राज्यवर्धन राठोड हेदेखील स्पर्धेत होते.