प्रशांत अंकुशराव, मुंबई : तुम्ही जिमला जात असाल, बॉडीबिल्डिंग करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. शरीर जरुर कमवा पण त्यासाठी वाट्टेल ते करु नका. कारण २३ वर्षांच्या एका तरुणाचा चांगली शरीरयष्टी कमावण्याच्या नादात धक्कादायक पद्धतीनं मृत्यू झाला आहे.
डोले, शोले करता करता लागली वाट
जिम करण्याचा बॉडी बनवण्याचा आणि सिक्स पॅक करण्याचा भलता अट्टाहास नको. आम्ही तुम्हाला हे सांगतोय याला कारण नोएडामध्ये जिम ट्रेनर आदेश यादवचा झालेला मृत्यू. आदेश अवघ्या २३ वर्षांचा तरुण होता. बॉडीबिल्डिंगची प्रचंड आवड.... त्यासाठी तो स्टेरोईडस घ्यायला लागला... गेली बरीच वर्षं तो स्टेरोईडसचं इंजेक्शन घ्यायचा. ११ मार्चला अचानक त्याची तब्येत बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल केलं पण त्याचा मृत्यू झाला. स्टेरोईडस घेतल्यानं आदेशचं हृदय कमकुवत झालं होतं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. भारतामध्ये अशा इंजेक्शन्सवर बंदी आहे. पण तरीही सर्रास चोरटी विक्री होते.
शरीर पिळदार बनवण्यासाठी अनेक जण तासं न तास व्यायाम करतात आणि कृत्रिम आहार घेतात. काही जण स्टेरॉइड्स घेतात. या स्टेरॉईडसच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष केलं जातं. निरोगी राहण्यासाठी शरीर सुदृढ हवं. पण पिळदार शरीराचा दिखावा नको.
स्टेरॉईडसमुळे (Steroids)हृदयरोगाची भीती वाढते. स्टेरॉईडसमुळे यकृतावर परिणाम होऊ शकतो. तसेच नपुंसकत्व येऊ शकतं. माणूस जास्त आक्रमक होतो. असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.