Ayodhya Ram Temple: ...अखेर रामलल्लाचे दर्शन झाले; पाहा मूर्तीचा पहिला पूर्ण फोटो

Ayodhya Ram Temple: सध्या संपूर्ण देशाला अयोध्या राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान त्याआधी मूर्तीचा पहिला पूर्ण फोटो समोर आला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 19, 2024, 04:03 PM IST
Ayodhya Ram Temple: ...अखेर रामलल्लाचे दर्शन झाले; पाहा मूर्तीचा पहिला पूर्ण फोटो

Ayodhya Ram Temple: सध्या संपूर्ण देशाला अयोध्या राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान राम मंदिरात मूर्ती विराजमान झाली असून, भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या मूर्तीचा पहिला फोटो समोर आला असून, प्रभू श्रीरामाचं बालरुप डोळे दिपवणारं आहे. यानंतर आता भक्त रामलल्लाच्या मूर्तीला याचिदेही याचिडोळा पाहण्यासाठी 22 जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

11 दिवसांच्या विशेष पूजा आणि धार्मिक विधींनंतर राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये विराजमान करण्यात आलेल्या या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा पार पडेल. म्हैसूर येथील प्रख्यात मूर्तीकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाची ही मूर्ती घडवली आहे. 51 इंचांची ही मूर्ती त्यांनी काळ्या शाळिग्राम शिळेपासून तयार केली आहे. 200 किलो वजनी मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 22 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास जुळून आलेला अवध्या 84 सेकंदांचा अती शुभ योग साधण्यात येणार आहे. 

5 वर्षांच्या रामलल्लाची मूर्ती निवडण्याचं कारण काय?

अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानला सुरुवात झाली आहे. 17 जानेवारीला प्रभू श्रीरामाची चांदीची प्रतिकात्मक मूर्ती आणण्यात आली होती. या मूर्तीसह मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. 18 जानेवारीला मुख्य मूर्तीला आसनावर विराजमान करत पूजन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. 

दरम्यान प्रभू श्रीराम यांची बालपणाची मूर्ती निवडण्याआधी फार चर्चा करण्यात आली. अयोध्या रामाचं जन्मस्थळ असल्याने त्यांची बालमूर्ती असावी असं अनेकांचं म्हणणं होतं. हे बालरुप पाहिल्यानंतर महिलांमध्ये मातृत्व भावना निर्माण होईल असं मंदिराच्या विश्वस्तांचं म्हणणं होतं. पण काहींच्या मते पूर्ण पुरुष असणारी मूर्ती विराजमान व्हावी असं सांगणं होतं. पण अखेर दीर्घ चर्चेनंतर बालमूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय झाला.