CORONA UPDATE : सणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिला अलर्ट, नागरिकांना केलं 'हे' आवाहन

गेल्या दोन दिवसांपासून 20 हजारांच्या आत असलेल्या देशाच्या कोरोना रुग्णसंख्येत आज पुन्हा वाढ झाली

Updated: Sep 30, 2021, 06:25 PM IST
CORONA UPDATE : सणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिला अलर्ट, नागरिकांना केलं 'हे' आवाहन title=

नवी दिल्ली : देशवासियांसाठी एक दिलासादायक बातमी, देशात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढत असून देशाचा रिकव्हरी रेट 98 टक्क्यांच्या जवळ पोहचला आहे. 

रिकव्हरी रेट वाढत असला तरी देशात सध्या सणासुदीचा काळ आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सचिव यांनी देशातील नागरिकाना आवाहन केलं आहे. गर्दी करु नका, शारीरिक अंतर ठेवा आणि मास्क वापरा असं आवाहन लोकांना सातत्याने केलं जात आहे.

केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहेत. सद्यपरिस्थितीत केरळमध्ये सर्वाधिक 1 लाख 44 हजार सक्रिय रुग्ण आहेत. म्हणजे देशाच्या रुग्णसंख्येच्या 52 टक्के रुग्ण संख्या एकट्या केरळमध्ये आहे. केरळनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात सध्या 40 हजार सक्रिय रुग्ण आहेत. यानंतर तामिळनाडूत 17 हजार, मिझोरममध्ये 16 हजार 800, कर्नाटकात 12 हजार आणि आंध्र प्रदेशमध्ये 11 हजार सक्रिय रुग्ण आहेत.

आयसीएमआरचे महानिर्देशक डॉ. बलराम भार्गव यांनी आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन केलं आहे. किमान या वर्षी तरी काही निर्बंध पाळायला हवेत असं डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे.  देशातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन देणं, ही प्राथमिकता असल्याचंही डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे.

गेल्या चोवीस तासात रुग्णसंख्या वाढली

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून 20 हजारांच्या आत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येत आज पुन्हा वाढ झाली. देशात गेल्या चोवीस तासात 23 हजार 529 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 311 जणांचा मृत्यू झाला आहे.