मुंबई : वयात आल्यानंतर घरची ओढ कमी आणि मित्र-मैत्रिणींसोबत युवा मुलं जास्त रमली जातात असं अगदी सहज म्हटलं जातं. पण ही वयात येत असलेली मुलं काहीवेळा एकटं राहण्याचा प्रयत्न करतात. कधी पालकांच्या हे लक्षात येतं कधी येतही नाही. जेव्हा त्यांना एकटं सोडलं जात नाही तेव्हा वाद होतात.
वयात येणारी ही मुलं ज्यांना टीनएजर म्हणून शकतो असा हा मुलांचा गट एकटं राहण्याकडे त्यांचा कल का असतो याबाबत जेव्हा अभ्यास करण्यात आला तेव्हा एक चकित करणारी गोष्ट समोर आली. या अभ्यासानंतर अहवाल मांडण्यात आला. त्यामध्ये यामागची काही कारण सांगण्यात आली आहे.
तुमच्या आजूबाजूला किंवा घरात जर असा एकटेपणा काही ना काही कारण काढून तरुण शोधत असतील तर तुमच्यासाठी ही माहिती नक्की महत्त्वाची आहे. या अहवालात काय म्हटलं आहे ते जाणून घेऊया.
सायकलॉजीटुडेडॉटकॉमच्या मते असं वागणाऱ्या तरुणांबद्दल पालकांना नको त्या शंका वाटू लागतात. त्यावरून संशयी वृत्ती वाढते आणि मग वादाला तोंड फुटतं. बऱ्याचदा पालकांना जे वाटत असतं तशी गोष्ट नसतेही पण संशयी वृत्तीमुळे हा घोळ होतो.
वयात आलेल्या मुलांना स्वत:ची जबाबदारी स्वत: घ्यायची असते. त्यासाठी त्यांना थोडा वेळ हवा असतो. त्यांना समजून घ्यायचं असतं. प्रत्येक गोष्ट स्वत: सांभाळायची असते. त्यांना कोणाचाही आधार त्यावेळी नको असतो. आई-वडिलांपेक्षा मित्र परिवार जवळचा वाटतो.
एकटं राहिल्यामुळे ही मुलं स्वत:ला वेळ देऊ शकतात आणि चांगलं समजून घेऊ शकतात. कोणत्या गोष्टींची सुधारणा गरजेची आहे हे त्यांना लक्षात येतं. पण काहीवेळा यामुळे एकलकोंड होण्याची भीती देखील तेवढीच असते.
प्रत्येक गोष्टीत आई-वडील पुढे असतील तर त्याला अशी भीती वाटते की पुढेही आई-वडिलांच्याच नावावे सगळं होईल. आपली वेगळी ओळख राहणार नाही. आपण काही करू शकत नाही ही कमीपणाची भावना येते. ही भावना दूर करण्यासाठी त्याला एकटेपणा हवा असतो.
प्रत्येक समस्या आणि त्यावर एकट्याने तोडगा काढणं हे युवा लोकांना करायचं असतं. त्यांचं मत विचारात घ्यावं असं वाटत असतं. दुसऱ्याने मतं लादण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट आपल्या डोक्याने सोडवण्याकडे भर असतो. याशिवाय एज गॅपमुळे देखील बऱ्याचदा पालकही समजून घेण्यात कमी पडतात त्यामुळे मुलं एकटं राहण्याची कारणं शोधतात.