मुंबई : अनेकदा काही दिवसांपूर्वी हसती खेळती व्यक्ती अचानक आपल्यातून गेल्याची माहिती मिळते अशा वेळेस हळहळ व्यक्त करण्यापेक्षा अधिक आपल्या हातात काहीच नसते.
काही तासांपूर्वी अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. श्रीदेवींचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टमुळे झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अशाप्रकारे कार्डिअॅक अरेस्टने मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे.
कार्डीएक अरेस्ट आणि हृद्यविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. मग पहा कार्डीएक अरेस्टचा धोका टाळण्यासाठी नेमके काय करावे ?
हृद्याच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास, त्याची धडधड अचानक बंद झाल्यास कार्डीएक अरेस्टचा धोका असतो. हार्ट अटॅकच्या झटक्यापेक्षा कार्डिएक अरेस्टचा धोका अधिक जीवघेणा असतो. कार्डिएक अरेस्टमध्ये रूग्ण बचावण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच वेळीच काळजी घेणं आवश्यक आहे.
सडन कार्डीएक अरेस्टचा धोका कसा कमी कराल ?
लठ्ठपणा ही आजकाल सर्रास वाढणारी समस्या आहे. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात नसल्यास हृद्यविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक वाढते.
व्यस्त जीवनशैलीमध्ये मधूमेह, हायपरटेन्शन आणि कोलेस्टेरॉल यांचे वाढते प्रमाण आरोग्याच्या अनेक समस्या वाढवण्यास कारणीभूत ठरते. यामुळे कार्डिएक अरेस्ट्चा धोकादेखील वाढतो.
नियमित 45मिनिटं व्यायाम करण इतका किमान व्यायामदेखील तुम्हांला आरोग्याच्या समस्या आटोक्यात ठेवण्यात मदत करतात. किमान आठवड्याचे पाच दिवस योगा, ध्यानधारणा, चालणं या व्यायामामुळे हृद्यविकाराचा धोका आटोक्यात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
धुम्रपानाची सवय आरोग्याला फारच धोकादायक ठरते. हृद्यविकाराचा धोका टाळण्यासाठी स्मोकिंगची सवय असल्यास त्यापासून ताबडतोब दूर रहा. स्मोकिंगच्या सवयीमुळे हृद्यविकारासोबतच इतर आरोग्याच्या समस्याही वाढू शकतात.
हृद्य कमजोर असणार्यांमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्यास प्रतिबंधात्मक उपाय करणं फायदेशीर ठरू शकते. लहान स्वरूपाचे पेसमेकर लावण्यात येते. या डिवाईसला ICD म्हणतात. या डिवाईसमुळे सुमारे 95% रूग्णांमधील कार्डिएक अरेस्टचा धोका आटोक्यात ठेवण्यास मदत होते.