मुंबई : व्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या विचित्र सवयी यांमुळे आज आबालवृद्धांमध्ये 'हद्यविकारा'चा धोका आढळणं सर्रास झालं आहे. हार्टअटॅक, कार्डिएक अरेस्ट हे तुम्ही ऐकलं असेल पण यापेक्षाही भयंकर स्टटरिंग हार्ट अटॅक असतो हे तुम्हांला ठाऊक आहे का? अनेकांच्या मनात आता 'स्टटरिंग हार्ट अटॅक' म्हणजे काय? हा प्रश्न आला असेल मग जाणून घ्या 'स्टटरिंग हार्टअटॅक'वर मात केलेल्या ओम पांडेंची ही खरी कथा ...
कल्याण येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय ओम प्रकाश पांडे यांना अँजिओप्लास्टीनंतर जणू नवे आयुष्यच मिळाले. दोनदा ईजीसी काढूनही हृदयविकाराच्या झटक्याची कोणतीही लक्षणे त्यात दिसत नव्हती. मात्र, दोनदा इजीसी काढल्यानंतर रुग्णाला अँजिओग्राफी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यात खरे कळले की या रुग्णाच्या हृदयात दोन ब्लॉकेजेस (एक ९९ टक्के तर दुसरा ९० टक्के) आहेत. त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली.
सकाळी ७ वाजता ओम पांडेंच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण, तिथे पोहचेपर्यंत त्यांचे दुखणे पूर्णपणे थांबले. रुग्णालयातील ईआरमध्ये त्यांचा ईसीजी काढण्यात आला. तो अगदी सामान्य होता. त्यानंतर २डी- इको ही चाचणी करण्यात आली. त्यानंतर तासाभराच्या निरिक्षण आणि औषधोपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, पाच तासांनी त्यांना पुन्हा त्याचप्रमाणे वेदना होण्यास सुरूवात झाली. पुन्हा त्यांना रुग्णालयात आणले गेले, पुन्हा ईसीजी काढला… पण, त्यातही काहीच बदल नव्हता. ईसीजी पूर्वीप्रमाणेच होता. मात्र, यावेळी २ डी इकोमध्ये काही प्रमाणात अबनॉर्मलिटीज दिसत होत्या.
या नव्या निष्कर्षांमुळे रुग्णाला कोरोनरी अँजिओग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांच्या अँजिओग्राममध्ये हृदयाची मुख्य धमनी (एलएडी) बंद पडल्याचे (९९ टक्के बंद) दिसत होते. त्यातून अपुरा आणि अनियमित रक्तपुरवठा होत होता. त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली. या परिस्थितीला 'स्टटरिंग हार्ट अटॅक' असे म्हणतात.
हृदयाला रक्त पुरवठा करणारी धमनी अनियमित कार्य करू लागली की स्टटरिंग हार्ट अटॅकचा त्रास उद्भवतो. एकीकडे ही धमनी गुठळ्यांमुळे पूर्णपणे बंद पडते परिणामी ह्दयाला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होऊ शकत नाही. तर दुसरीकडे, ही गुठळी मध्येच बाजूला सरकून हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्याला बारीकशी वाट करून देत होती. त्यामुळे वेळीच त्याचे निदान होणं कठीण होऊन बसतं.
एसआरव्ही ममता हॉस्पिटलचे ज्येष्ठ कार्डिऑलिजस्ट डॉ. विनायगा पंडियन म्हणाले, "आपल्या हृदयाला होणारा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा अनियमित प्रकारे होतो, त्यामुळे रुग्णाला थोडा वेळ त्रास होतो, त्यानंतर बरे वाटते. या अधूननमधून जाणवणाऱ्या लक्षणांमुळे रुग्णाप्रमाणचे डॉक्टरांनाही हा अपचनाचा किंवा हृदयविकाराप्रमाणे लक्षणे असणाऱ्या इतर आजारांचा त्रास वाटू शकतो. "
दुर्दैवाने, हृदयविकाराच्या गंभीर झटक्याच्या तुलनेतही स्टटरिंग हार्ट अटॅक अधिक गंभीर असतो. चाचण्यांच्या निकालांमुळे रुग्ण आणि डॉक्टर्स दोघेही उपचारांमध्ये विलंब करू शकतात आणि या विलंबामुळे हृदयाची अधिक हानी होत जाते. स्टटरिंग हार्ट अटॅक ही कधीही स्फोट होणारी एक मोठी आपत्तीच असते. त्यामुळे कोणतेही दुखणे अंगावर काढण्यापेक्षा सुरूवातीच्या टप्प्यावरच त्याकडे लक्ष देणं गरजेचे आहे.