बॉलिवूडमधील सुपरस्टार फॅमिलीपैकी एक अमिताभ बच्चन यांचं कुटुंब कायम चर्चेत असतं. बिग बी यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला चाहते कायम उत्सुक असतात. मध्यंतरी अमिताभ यांचा मुलगा, अभिनेता अभिषेक आणि सून - अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. या बातम्यांमध्ये किती तथ्य होतं हे काही समोर आलं नाही. दरम्यान 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात त्यांच्या करिअरमधील किस्से, कुटुंबासंबंधी आणि अनेक वेळा स्वत:बद्दल अनेक किस्से ते सांगत असतात. पण नुकताच 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता बच्चन नंदा हिच्याबद्दल धक्कादायक खुलासा केलाय.
कौन बनेगा करोडपती 16 च्या नवीनतम भागात, आयआयटी दिल्लीचा विद्यार्थी उत्सव दास हॉट सीटवर बसला आणि त्याने त्याच्या खेळाने बिग बींना प्रभावित केलं. दरम्यान, यावेळी बिग बींनी त्यांची मुलगी श्वेता बद्दल एक मनोरंजक किस्सा सगळ्यांना सांगितला.
उत्सव दासने बिग बींना सांगितले की त्याने पहिल्याच प्रयत्नात आयआयटी परीक्षा उत्तीर्ण केलीय. उत्सवने सांगितलं की त्याच्या वडिलांनी त्याला आव्हान दिलं होतं. त्याचे वडील एनआयटी पदवीधर आहेत आणि ते त्याला अनेकदा चिडवायचे. उत्सवने त्याच्या वडिलांच्या या वागण्यातून प्रेरणा घेतली आणि आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर, उत्सवने पहिल्याच प्रयत्नात आयआयटी उत्तीर्ण करुन सर्वांना आनंदाचा धक्का दिला.
यासोबतच उत्सवने आयआयटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही टिप्सही दिल्या आणि यावेळी त्यांनी सांगितले की, अभ्यासासोबतच स्वतःला आरामशीर ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. त्याने सांगितलं की, त्याच्या आयआयटी परीक्षेच्या आधी एका दिवशी तीन चित्रपट पाहायचा. त्यांनी 'ओपेनहायमर', 'जवान' आणि 'ब्रह्मास्त्र' चित्रपट पाहिले आहेत. दरम्यान, उत्सव दासशी बोलताना अमिताभ बच्चन यांनी त्यांची मुलगी श्वेताबद्दल असलेली भीती उघडपण बोलून दाखवली. बिग बी म्हणाले की, श्वेताला इंजेक्शनची खूप भीती वाटायची. तिला इंजेक्शन्सची इतकी भीती वाटायची की तिला बांधून ठेवावे लागत होते.
खरंतर, उत्सव दासने 12 लाख 50 हजार रुपये जिंकले, त्यानंतर त्याच्याकडे 25 लाख रुपयांचा प्रश्न होता. 25 लाख प्रश्न असा होता की, 'यापैकी कोणत्या संस्थेतील संशोधकांनी औषधे इंजेक्शन देण्यासाठी सुई-मुक्त शॉक सिरिंज विकसित केली आहे?' उत्सवला उत्तर माहित होते, त्याने लगेच उत्तर दिलं - 'आयआयटी बॉम्बे.' यानंतर, बिग बी यांनी श्वेता बच्चनला इंजेक्शन्सची भीतीबद्दल सांगितलं.
अमिताभ बच्चन म्हणाले की, बहुतेक महिला इंजेक्शनला घाबरतात. पण प्रेक्षकांमध्ये बसलेल्या महिला त्याच्याशी सहमत दिसत नव्हत्या. यावर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुलीचे उदाहरण देत म्हटलं की, 'आम्ही हे सांगत आहोत कारण आम्हाला एक मुलगी आहे, ती इंजेक्शनला खूप घाबरते.' जर त्यांना इंजेक्शन द्यायचे असतील तर तिला बांधून ठेवावे लागतं, नाहीतर ती पळून जाईल. हे ऐकून सगळे हसायला लागले.