Chhaava Trailer: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला 'छावा' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच पार पडला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्याची गाथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. विकी कौशल याने छत्रपती संभाजीराजे आणि रश्मिका मंदाने हिने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. काल या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात रश्मिका मंदाना हिने चित्रपटाबाबत व तिच्या भूमिकेबद्दल सविस्तर बातचीत केली आहे.
'दक्षिणेकडील एका मुलीला महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारायला मिळाली हा माझ्यासाठी खूप भाग्याचा क्षण आहे. मी लक्ष्मण सरांना सांगितलं आहे की ही भूमिका साकारल्यानंतर मी आनंदाने या क्षेत्रातून निवृत्त होऊ शकते. मी फार भावूक वगैरे होत नाही पण चित्रपटाचा ट्रेलर पाहून मी भावून झाले. विकी तर देवासारखा दिसतो, तो खरंच छावा आहे,' असं रश्मिकाने म्हटलं आहे.
'लक्ष्मण सरांनी मला या भूमिकेसाठी विचारल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला होता. मी त्यांच्यापुढे सरेंडर केलं होतं. मला या कथेचा संदर्भ माहिती नव्हता. मला फक्त कथा माहिती होती. महाराणी येसुबाई यांचे इतके प्रभावी व्यक्तमत्व आहे ते कसं साकारावं, असा प्रश्न मला पडला होता,' असं रश्मिकाने म्हटलं आहे.
'लक्ष्मण सरांना या भूमिकेसाठी जे जे हवं ते ते मी स्वीकारलं. भाषेच्या बाबतीत व इतरही काही गोष्टींची बाबतीत खूप रिहर्सल करावी लागली. पण तुमचा तुमच्या टीमवर असलेला विश्वास कारण तुम्हाला माहितीये की जर कोणाला हे साध्य करायचे असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे अडथळे पार करु शकतात. तुम्हाला फक्त इतकंच म्हणायचे आहे की, सर मी पूर्णपणे तयार आहे. तुम्ही जे सांगाल तसेच काम माझ्याकडून होईल,' असंही रश्मिकाने म्हटलं आहे.
छावा चित्रपटात अक्षय खन्ना याने औरंगजेबची भूमिका साकारली आहे. त्या व्यतिरिक्त आशुतोष राणा, दिव्या दत्ता, नील भूपालम, संतोष जुवेकर आणि प्रदीप रावत हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसंच, चित्रपटाची गाणी ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केली आहेत. तसंच, 14 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्याच्या आधीच हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.