'इतकी वर्ष मनात किंतु होता पण...', वडिलांच्या आठवणीने फुलवा खामकर भावूक, पोस्टनं वेधलं लक्ष

Phulwa Khamkar Father : आपल्या वडिलांच्या प्रती असलेले प्रेम एका मुलीसाठी हे नक्कीच मौल्यवान असते. लोकप्रिय कोरिओग्राफर फुलवा खामकर हिनं आपल्या वडिलांच्या अनिल बर्वे यांच्या 39 व्या स्मृतीप्रत्यर्थ एक भावूक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

गायत्री हसबनीस | Updated: Dec 9, 2023, 04:36 PM IST
'इतकी वर्ष मनात किंतु होता पण...', वडिलांच्या आठवणीने फुलवा खामकर भावूक, पोस्टनं वेधलं लक्ष title=
phulwa khamkar shares an emotional post on her fathers death anniversary

वडिलांची जागा ही प्रत्येक मुलीसाठी खास असते. त्यांच्या आठवणी, त्यांनी लहानपणापासून आपल्यासाठी केलेली धडपड, आपला प्रत्येक क्षण आनंदी करण्यासाठी केलेला खटाटोप यामुळे वडील आणि मुलांचे नाते हे अतूट असते. लोकप्रिय नृत्य दिग्दर्शिक फूलवा खामकरनं अशीच एक हळवी पोस्ट नुकतीच शेअर केली आहे. फूलवा ही लोकप्रिय लेखक अनिल बर्वे यांची मुलगी आहे. वडिलांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्तानं फूलवा त्यांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. यावेळी तिनं अनिल बर्वे यांचे खूप जुने फोटो शेअर केले आहेत. आपल्या वडिलांसोबतचा लहानपणीचा गोंडस फोटोही तिनं शेअर केला आहे. 

फुलवा खामकरची पोस्ट : 

तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, '' बाबा…. आज तुम्हाला जाऊन 39 वर्ष झाली. मी पाचवी मध्ये होते. सकाळपासून खूप धडधडत होतं. आई हॉस्पिटलमधून आली आणि तिने सांगितलं, 'बाबा गेले'. मला फक्त आजोबांचा आक्रोश आठवतोय. आजी आणि आई खूप शांत होत्या!

दारूमुळे माणूस इतका असहाय्य होऊ शकतो? एक अत्यंत प्रतिभावान, हुशार आणि जगाच्या पुढे असणारा माणूस दारूमुळे वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी जातो हे भयानक आहे! मग बाबा हा कप्पा मी पूर्णपणे बंद करून ठेवला!

मात्र तुमच्या लिखाणामुळे आजच्या पिढीला सुद्धा लेखक अनिल बर्वे माहीत आहे याचा खूप आनंद आम्हाला होतो. अनिल बर्वे यांची आम्ही मुलं आहोत हा अभिमान सुद्धा आम्हाला आहे 'ज्यूलिएटचे डोळे', 'रोखलेल्या बंदुका' आणि 'उठलेली जनता', 'कोलंबस वाट चुकला', 'अकरा कोटी गॅलन पाणी', 'थँक यू मिस्टर ग्लाड', 'हमीदाबाईची कोठी', 'स्टड फार्म', 'डोंगर म्हातारा झाला', 'पुत्र कामेष्टी', 'मी स्वामी या देहाचा', 'आकाश पेलताना'. किती किती वेगळं आणि काळाच्या पुढचं लिखाण होतं तुमचं बाबा !!

तुमच्या उमेदीच्या काळात तुम्ही केलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे तुम्ही चालवलेलं एक फिल्मी मासिक, ज्याचं नाव होतं 'फुलवा', नेहमीप्रमाणे ते सगळं व्यवस्थित बुडलं, कुण्या एका मित्राने तुम्हाला सांगितलं की 'फुलवा' हे नाव लाभदायक नव्हे. झालं भविष्य, देव, धर्म यावर विश्वास नसलेल्या तुम्हाला याचा राग आला आणि तुम्ही म्हणालात मला जर मुलगी झाली तर तिचं नाव मी 'फुलवा'च ठेवणार, ती नाव काढेल! हा किस्सा मला हल्लीच समजला आणि आम्ही खूप हसलो. आणीबाणीच्या काळात तुमच्यावर नजर ठेवणाऱ्या गुप्त पोलिसाला त्याला उगाच त्रास नको म्हणून तुम्ही बरोबरच घेऊन फिरत होता.

बाबा तुम्ही सामान्य माणूस या कक्षेत बसणारे नव्हता. पण एक मुलगी म्हणून मात्र माझ्याकडे तुमच्या खूप वेगळ्या आणि काहीशा कटू आठवणी आहेत कारण मला आठवणारे बाबा दारूच्या खूप आहारी गेले होते. इतक्या गोड माणसाला ती दारू संपवीत होती. आम्ही खूप लहान होतो! मी 9 वर्षांची, राही 4 आणि आमच्या हातात काहीच नव्हतं! असहाय्य होतो आम्ही…

बाबा, इतकी वर्ष तुमच्याबद्दल मनात एक किंतू होता पण आता तो नाहीये! कदाचित आता तुमच्याकडे एक माणूस म्हणूनसुद्धा मी पाहू शकतेय इतका समजूतदारपणा वयामुळे माझ्यात आला असावा. आज मला खरंच खूप वाटतंय की तुमच्या दोन्ही मुलांचं पुढे काय झालं हे पाहायला तुम्ही हवे होतात. आज तुमच्या मुलीचं नाव फुलवा ठेवल्याचा तुम्हाला आनंद झाला असता आणि राहीला पाहून, त्याचं काम पाहून त्याला डोक्यावर घेऊन तुम्ही नाचला असतात. तुमच्या लिखाणाचा वारसा त्याने घेतला आहे. आज तुम्हाला आमचा अभिमान वाटावा असं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय बाबा !

तुमची फुलवा'' सध्या फुलवाच्या या पोस्टखाली नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनीही कमेंट्स केल्या आहेत. तिची ही हळवी पोस्ट वाचून अनेक जणं भावूक झाले आहेत. या छोट्याश्या पोस्टमधून तिनं अनिल बर्वे यांची माहिती नसलेली ओळखही प्रेक्षकांना करून दिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फुलवानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनिल बर्वे यांच्यासह परिवार आणि अनेक दिग्गज मंडळींही दिसत आहेत. एका फोटोत त्यांच्यासह दिवंगत ज्येष्ठ अभिनेते, नाट्यकर्मी प्रभाकर पणशीकरही दिसत आहेत. फुलवाचा सख्खा भाऊ राही अनिल बर्वे हा देखील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'तुंबाड' हा चित्रपट बराच गाजला.