Nana Patekar on Being in Underworld : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर हे त्यांच्या अभिनयासोबत त्यांच्या रागामुळे देखील चर्चेत असतात. बऱ्याच काळापुर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. त्यात त्यांनी सगळ्यांसमोर एका चाहत्याला कानशिलात लगावली होती. त्यानंतर नाना यांनी यावर स्पष्टिकरण देत सांगितलं होतं की त्यांनी जे केलं ते चुकीचं होतं त्यांनी असं मारायला नको होतं. पण त्यांचं असं रागावणं हे नवीन नाही. त्यांच्या रागाविषयी स्वत: नाना पाटेकरांनी मौन सोडलं असून ते किती रागीट आहे याविषयी त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी थेट सांगितलं की त्यांचा राग पाहता जर ते कलाकार नसते तर ते डॉन झाले असते.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी हा खुलासा केला आहे. नाना पाटेकर यांनी सांगितलं की त्यांना खूप जास्त राग येतो. पण अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवर ते संतापत नाही. कोणी स्वत: चं काम नीट करत नाही हे त्यांना जेव्हा दिसून येतं तेव्हा ते संतापतात. नाना पाटेकर याविषयी म्हणाले की "राग येतोच रे. आता तुझं माझं नातं चित्रपटाशी आहे. आता जर तुला चित्रपटांशी प्रेम नाही तर मला तुला भेटायला देखील आवडणार नाही. तू तिथे 100 टक्के असायला हवं. तू जेव्हा 100 टक्के देशील तेव्हाच चित्रपट चांगला होईल. तुझं संपूर्ण लक्ष त्यातच असायला हवं. तुला ओळख हवी, श्रीमंती हवी, प्रत्येकानं येऊन तुझ्यासोबत फोटो काढायला हवा. तर हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा तू तुझं 100 टक्के देणार. त्यामुळे हे सगळं फुकटात मिळत तर नाही. 100 टक्के न देता हे सगळं मिळालं तर त्याला अॅक्सिडंट बोलता येईल. पण ते एकाच चित्रपटासाठी राहिल. दुसऱ्यांदा तुमच्याकडे कोणी येणार नाही."
पुढे नाना पाटेकर यांनी सांगितलं की "मी खूप जास्त रागीट होतो. मी ऐकत नाही खूप कमी बोलतो. आताच्या तुलनेत मी त्यावेळी तर खूप रागीट होतो. पण आजही जर कोणती गोष्ट अती होत असेल किंवा हद्द पार झाली असेल तर माझा हात उठतोच. पण आधी मी खूप जास्त रागीट होतो. म्हणजे जर मी अभिनेता नसतो तर अंडरवर्ल्डमध्ये असतो आणि मी मस्करी करत नाही आहेत. ही हसण्याची गोष्ट नाही. हे सत्य आहे. हा कॅमेरा मिळाला आणि मी अभिनेता झालो. राग बाहेर काढण्याचा हा एक मार्ग आहे, लोकांनाकडे काही मार्ग असतो का? ते कसे राग काढणार. त्यामुळेच कधी दंगल झाली तर त्यात एक सर्वसाधारण आणि सामान्य माणूसही दगड उचलतो."
नाना पाटेकरांनी पुढे हे देखील सांगितलं की "त्यांनी अनेक कलाकारांच्या कानशिलात लगावली आहे. मी अनेकांवर हात उगारला आहे. आता तर लक्षातही नाही. भांडणं व्हायची आणि त्याचं हे कारण नव्हतं की ते माझ्याहून चांगलं काम करतात, तर कारण हे होतं की ते चांगलं काम करत नव्हते."