मुंबई : मी टू अभियानामध्ये निर्माता दिग्दर्शक सुभाष घाई यांचं नावही आता समोर आलंय. सुभाष घई यांच्यावर त्यांचा माजी कर्मचाऱ्यानं बलात्काराचा आरोप केला आहे. या महिलेचं नाव अजूनही समोर आलेलं नाही. पण लेखिका महिमा कुकरेजा यांनी ट्विटरवर एक स्क्रीनशॉट टाकून या घटनेला वाचा फोडली आहे. सुभाष घईंसोबत काम करताना माझ्यावर अत्याचार झाल्याचं या पीडित महिलेनं सांगितलं आहे.
सुभाष घईंबद्दल धक्कादायक बातमी.. पीडित महिलेनं तिच्यावरचा अन्याय सांगितला. ती व्यक्ती मीडियातली सुप्रसिद्ध व्यक्ती आहे, असं ट्विट महिमा कुकरेजा यांनी केलं आहे.
काय म्हणाली पीडित महिला?
''सुभाष घईंसोबत एका चित्रपटासाठी काम करताना हे सगळं घडलं. मी मार्गदर्शकाची भूमिका बजवेन आणि चित्रपटसृष्टीत तुला मार्गदर्शन करीन, असं घईंनी मला सांगितलं. मी त्यांची ही गोष्ट मान्य केली कारण इकडे माझा कोणीच गॉ़डफादर किंवा मित्र-मैत्रिण नव्हतं. मी मुंबईत नव्हते पण मला शिकायचं होतं आणि स्वत:ला सिद्ध करायचं होतं.
सुरुवातीला ते माझ्याबरोबर म्यूझिक रेकॉर्डिंगबद्दल बोलायचे. तेव्हा मला रात्रीपर्यंत इतर पुरुष सदस्यांसोबत बसायला लागायचं. जेव्हा रेकॉर्डिंग पूर्ण व्हायचं तेव्हा मी रिक्षानं घरी जायचे किंवा ते मला सोडायला घरी यायचे. हळू-हळू त्यांनी माझ्या जांघेवर हात ठेवायला सुरुवात केली. मला मिठी मारत ते चांगलं काम केलं असं सांगायचे. यानंतर स्क्रिप्टवर काम करण्यासाठी ते मला फोन करून लोखंडवालामध्ये बोलवायचे. दुसऱ्या अभिनेत्रींसोबत मी स्क्रिप्टवर काम करीन, असं त्यांनी मला सांगितलं.
जेव्हा मी पोहोचले तेव्हा तिकडे कोणीही नव्हतं. ते घरात एकटेच होते. ते पत्नीबरोबर राहायचे ते हे घर नव्हते. स्क्रिप्टवर बोलण्याऐवजी त्यांनी दुसऱ्या गोष्टीवर बोलायला सुरुवात केली. माझ्याबद्दल चित्रपटसृष्टीनं चुकीचा समज केल्याचं सांगत त्यांनी रडायचं नाटक सुरू केलं आणि माझ्या मांडीवर डोकं ठेवलं. यानंतर ते उभे राहिले आणि जबरदस्ती मला किस करायला लागले. मी घाबरले आणि तिकडून पळ काढला.
ते मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. माझी मानसिक स्थिती नीट नव्हती. तिकडे त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी टोस्टची ऑर्डर केली. त्यादिवशी मी खूप उलट्या केल्या''