थाटामाटात पार पडला शिवानी सुर्वेचा साखरपुडा, फोटो आले समोर

Shivani Surve Ajinkya Nanaware Engegement : शिवानी सुर्वेने तिच्या सर्व चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. 'अखेर साखरपुडा पार पडला', असं म्हणत चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे.   

Updated: Jan 31, 2024, 09:15 PM IST
थाटामाटात पार पडला शिवानी सुर्वेचा साखरपुडा, फोटो आले समोर title=

Shivani Surve Ajinkya Nanaware Engegement : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून शिवानी सुर्वेला ओळखले जाते. शिवानी ही छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ सिझन २ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आली होती. शिवानी ही कायमच तिच्या वैयक्तिक कारणांनी चर्चेत असते. आता शिवानी सुर्वेने तिच्या सर्व चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. शिवानी सुर्वेने तिचा बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेबरोबर गुपचूप साखरपुडा उरकला आहे. त्याचे फोटोही तिने पोस्ट केले आहेत. 

शिवानी सुर्वे ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने अखेर साखरपुडा पार पडला, असं म्हणत चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. शिवानी सुर्वेने साखरपुड्यावेळी जांभळ्या रंगाची नेटची साडी परिधान केली होती. त्यावर फुलांची डिझाईन पाहायला मिळत आहे. तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर डिझाईनर जॅकेट परिधान केले आहे.

शिवानी सुर्वेच्या साखरपुड्याचे फोटो

यावेळी शिवानीच्या हातावर मेहंदी आणि हिरवा चुडाही पाहायला मिळाला. शिवानी सुर्वेने शेअर केलेल्या फोटोत ते दोघेही एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत. यावेळी ते दोघेही प्रचंड आनंदात पाहायला मिळत आहेत. शिवानी आणि अजिंक्यचा साखरपुडा कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला. 

शिवानी सुर्वे आणि अजिंक्यच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकार या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेता स्वप्नील जोशीने तिच्या या फोटोवर खूपच सुंदर, दोघांनाही शुभेच्छा, अशी कमेंट केली आहे. तर ऋतुजा बागवे, मानसी नाईक, मीरा जगन्नाथ या अभिनेत्रींनी अभिनंदन अशी कमेंट केली आहे. तसेच अनेक चाहतेही त्यांना शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत.  

शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेची लव्हस्टोरी

शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरेची पहिली भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. या काळात त्या दोघांची घट्ट मैत्री झाली. यानंतर काही काळाने त्या दोघांच्या मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं. ते दोघेही २०१७ पासून एकमेकांना डेट करत आहेत. शिवानी आणि अजिंक्य यांनी काही दिवसांपूर्वीच 2024 मध्ये लग्न करणार असल्याचे सांगितले होते.

आणखी वाचा : '...म्हणून मला चॉकलेट बॉय ही ओळख आवडत नाही', शाहिद कपूरने केला खुलासा

दरम्यान शिवानी ही 'झिम्मा 2' या चित्रपटात झळकली होती. त्यासोबत ती 'सातारचा सलमान', 'वाळवी', 'ट्रीपल सीट', 'घंटा' या चित्रपटातही झळकली होती. लवकरच ती स्वप्नील जोशीसह ‘जिलेबी’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तर अजिंक्य ननावरेही उत्तम अभिनेता असून सध्या तो ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहे. यात तो प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याबरोबरच अजिंक्यने ‘सुभेदार’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.