Shah Rukh Khan Jawan Review: बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित 'जवान' चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला एवढ्या मोठ्या प्रमाणात अगाऊ बुकिंग मिळालं की रात्री 2 वाजताचेही शो काही जागी आयोजित करण्यात आले होते. सोशल मीडियावर शाहरुख बरोबरच अभिनेत्री नयनतारा, प्रिया मणी, सानया मल्होत्रा, अभिनेत्री सुनील ग्रोव्हरच्या भूमिकेने नटलेल्या या चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चित्रपटगृहांबाहेरील रांगापासून ते चित्रपटगृहांमधील डान्सपर्यंतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता या चित्रपटाचे पहिले रिव्ह्यू समोर आले आहेत. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही सोशल मीडियावर रिव्ह्यू पोस्ट केला आहे. त्यांनी चित्रपटाबद्दल काय म्हटलं आहे पाहूयात...
एका शब्दात रिव्ह्यू सांगायचा झाल्यास हा चित्रपट मेगा-ब्लॉकबस्टर आहे असं तरण आदर्श यांनी म्हटलं आहे. "शाहरुखने आतापर्यंत केलेल्या चित्रपटांना साजेसा हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये मनोरंजनासाठी आवश्यक असलेला सर्व मसाला यामध्ये आहे. अटलीने शाहरुखचं पात्र अगदी उत्तम पद्धतीने मांडला आहे. शाहरुख त्याच्या कामगिरीने चित्रपटामध्ये अगदी आग ओकतोय. 'पठाण'मधून चाहत्यांनी बाहेर आलं पाहिजे. जवान बॉक्स ऑफिसवर सत्ता गाजवण्यासाठी आणि चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी आला आहे," असं तरण आदर्श यांनी म्हटलं आहे.
"जवानमध्ये अनेक हुकमी एक्के आहेत. अगदी शार्प स्क्रीनप्ले, प्रत्येक दृष्य दाखवताना अगदी त्यामधील बारीससारीक गोष्टींची घेतलेली काळजी, भन्नाट अॅक्शन सीन्स, अवाढव्य फ्रेम्स, उत्तम पार्श्वसंगीत असलेला हा चित्रपट असून या चित्रपटाचा वेग आणि ऊर्जा किंचतही कमी होत नाही," असं तरण आदर्श यांनी म्हटलं आहे. मात्र पुढे लिहिताना त्यांनी, "असं असलं तरी या चित्रपटामध्ये 2 मोठे कलाकार एकमेकांसमोर उभे आहेत. हा चित्रपट म्हणजे शाहरुख खान आणि विजय सेतूपती या 2 दिग्गजांच्या अभिनयाची जुगलबंदी आहे. हीच जुगलबंदी चित्रपटामधील महत्त्वाचा घटक आहे," असं तरण आदर्श यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
नक्की पाहा >> ...अन् शाहरुख खान स्टेजवर आलेल्या 'त्या' महिलेसमोर नतमस्तक झाला; Video चर्चेत
"जवानमधील सर्वच कलाकारांनी अभिनय फार उत्तम केला आहे. अगदी विजय सेतुपतीपासून नयन तारा, दीपिका पादुकोण, संजय दत्त सर्वांनीच एका उत्तम स्क्रीप्टसाठी छान योगदान दिलं आहे," असं तरण आदर्श यांनी म्हटलं आहे. "इतर कलाकारांनी चांगली कामगिरी केली असली तरी 'जवान' हा शाहरुखचा चित्रपट आहे. 2023 हे शाहरुखचं वर्ष असेल हे सांगण्यासाठी कोणा भविष्यकाराची गरज नाही. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतोय पाहूयात..." असं म्हणत तरण आदर्श यांनी आपली पोस्ट संपवली आहे. तरण आदर्श यांनी शाहरुखच्या जवान चित्रपटाला 4.5 स्टार्स दिले आहेत.
शाहरुख खानच्या या चित्रपटाने तिकीट विक्रीचे अनेक विक्रम मोडल्याचंही तरण आदर्श यांनी म्हटलं आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच्या दिवशीच म्हणजेच बुधवारी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत पीव्हीआर-आयनॉक्सने 'जवान'ची 4 लाख 48 हजार तिकीटं विकली. तर सिनेपोलीसने 1 लाख 9 हजार तिकीटं विकली. एकूण 5 लाख 57 हजार चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच विकली गेली. 'पठाण'शी तुलना केल्यास ही विक्री अधिक आहे. 'पठाण'ची 5 लाख 57 हजार तिकीटं विकली गेली होती.