सिनेमा : गोलमाल अगेन
दिग्दर्शक : रोहित शेट्टी
कलाकार : अजय देवगन, अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी, बृजेश हिरजी, तबू आणि परिणीती चोपडा
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगन अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' आज प्रदर्शित झालाय. या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून लागून होती... कारणही तसंच होतं... दोन - दोन वर्षांत 'गोलमाल' सीरिज पडद्यावर आणणाऱ्या रोहीतनं 'गोलमाल अगेन'साठी तब्बल सात वर्ष घेतलेत.
दिवाळीच्या दिवसांत प्रदर्शित झालेला 'गोलमाल अगेन' हा सिनेमा प्रेक्षकांसाठी हास्याचे फटाके घेऊन आलाय. अजय देवगनशिवाय या सिनमात अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी, बृजेश हिरजी, तबू आणि परिणीती चोपडा मुख्य भूमिकांत दिसत आहेत.
सिनेमाची कथा जमनादास अनाथआश्रमातील सहा मुलांवर केंद्रीत आहे. यामध्ये गोपाल (अजय देवगन), लकी (तुषार कपूर), माधव (अर्शद वारसी), लक्ष्मण - एक (श्रेयस तळपदे), लक्ष्मण - दोन (कुणाल खेमू) आणि पप्पी (जॉनी लिव्हर) यांचा समावेश आहे. एकमेकांपासून वेगले होऊन ते पुन्हा कसे एकत्र येतात याची ही कहाणी..
तब्बू या अनाथ आश्रमातील लायब्रेरियनच्या - 'ऐना'च्या भूमिकेत आहे... तर परिणीती चोपडा 'खुशी'च्या भूमिकेत दिसते. गोपाल खुशीच्या प्रेमात पडतो... तर ऐना आत्म्यांशी संवाद साधताना दिसते.
सिनेमात नील नितिन मुकेश निखिल आणि प्रकाश राज वासू रेड्डीच्या भूमिकेत दिसतात. व्यावसायिक कारणातून निखिल आणि वासू या अनाथ आश्रमाला इथून हटवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
पाचही हिरो आपला अनाथ आश्रम वाचवण्यासाठी निखिल आणि वासूशी भिडतात. त्यातच आणखी तीन पात्रांची एन्ट्री होते... वसूली भाई (मुकेश तिवारी), भूला (जॉनी लिव्हर) आणि बबली भाई (संजय मिश्रा) यांच्या एन्ट्रीनंतर कहाणीत अनेक बदल होतात... आता हे बदल नेमके काय होतात.. हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल...
हा सिनेमा पाहताना तुम्ही नक्कीच बोअर होणार नाहीत... प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला खळखळून हसायला भाग पाडतील. दिग्दर्शकाचं कामही तुम्हाला दिसून येईल. सिनेमातील मोठे मोठे सेटस् आणि रंगीबेरंगी ठिकाणं लोकांना आकर्षित करतात. रोहित शेट्टीची शूटिंग स्टाईल त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते.
सिनेमात साजिद-फरहाननं खूप चांगले संवाद लिहिलेत. सिनेमातील गाणे चांगले आहेत पण ते सिनेमाची गती मंदावण्यासाठी कारणीभूत ठरतात. डोकं बाजुला ठेवून सिनेमा पाहिलात तर जास्त एन्जॉय करू शकाल.