उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी अभिनेत्री आणि फिल्म निर्माता आरुषी निशंकची मुंबईमधील दोन निर्मात्यांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये मानसी वरुण बागला आणि वरुण प्रमोद कुमार बागला यांनी आरुषी निशंकची 4 कोटींची फसवणूक केली. त्यासोबतच तिचा मानसिक छळ आणि धमकी दिल्याचा देखील तिने आरोप केला आहे. तिने या प्रकरणी सध्या देहारादूनच्या पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
खरंतर आरुषी निशंक तिच्या हिमश्री फिल्म या निर्मिती कंपनीअंतर्गत चित्रपट निर्मिती आणि अभिनयाशी संबंधित आहे. जी या क्षेत्रात बराच काळापासून सक्रियपणे काम करत आहे. अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुंबईतील निर्माते मानसी आणि वरुण बागला यांनी काही दिवसांपूर्वी तिच्याशी संपर्क साधला होता आणि स्वतःची ओळख मिनी फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक म्हणून करून दिली होती. त्यांनी आरुषीला सांगितले होते की, ते'आँखों की गुस्ताखियां' चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ज्यामध्ये शायना कपूर आणि विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत असतील. चित्रपटात दुसरी मुख्य भूमिका मिळवून देण्याच्या आणि गुंतवणुकीच्या नावाखाली दोघांनीही वेगवेगळ्या वेळी आरुषी निशंककडून 4 कोटी रुपये घेतले.
त्यांच्यावर विश्वास ठेवून अभिनेत्री आरुषीने 9 ऑक्टोबर 2024 रोजी मिनी फिल्म्स प्रायव्हेट कंपनीसोबत एक सामंजस्य करारही केला. यानंतर 10 ऑक्टोबर रोजी त्यांनी पहिला हप्ता म्हणून 2 कोटी रुपये दिले. यानंतर, 30 ऑक्टोबर रोजी आणखी 75 लाख रुपये देण्यात आले. यानंतरही 19 नोव्हेंबर रोजी 1 कोटी रुपये आणि 27 नोव्हेंबर रोजी 25 लाख रुपये देण्यात आले.
पोलिसांकडून तपास सुरु
त्यानंतर त्यांनी आरुषीचं ना प्रमोशन केलं ना स्क्रिप्ट फायनल केली. त्यांनी अखेर आरुषीला फिल्ममधून बाहेर केलं. त्यानंतर आरुषीने त्यांना पैसे मागितले तर तेव्हा त्यांनी भारतामधील शूटिंग संपलं असून तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात आल्याचं सांगितलं. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच देहरादून पोलीस मुंबई मिनी फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांना चौकशीसाठी बोलावू शकतात.