Raju Srivastava Update : जीवन- मृत्यूची झुंज देणाऱ्या विनोदवीर राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसाठी सध्या चाहते अविरत प्रार्थना करत आहेत. कुटुंबीय, चाहते, मित्रपरिवार प्रत्येकजण त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे. अशा परिस्थितीत श्रीवास्तव यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही माध्यमांसमोर येत परिस्थितीविषयीची माहिती देत अफवांना पूर्णविराम दिला आहे. (Raju Srivastav health update)
दरम्यान, राजू श्रीवास्तव यांच्या मुलीच्या कर्तबगारीनं एकाएकी सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. वयाच्या 12 व्या वर्षी तिला या कामगिरीसाठी थेट तत्कालीन राष्ट्रपती, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होतं.
(Raju Srivastav) श्रीवास्तव यांच्या लेकिनं म्हणजेच अंतरानं केलेली कामगिरी सर्वांनाच तिची नवी ओळख करुन देणारी ठरली. तिनं फार कमी वयात मोठं धाडस दाखवत, स्वत:च्या आईला चोरट्यांपासून वाचवलं होतं.
जेव्हा घरात घुसलेले चोर....
राजू श्रीवास्तव यांची पत्नी आणि त्यांची लेक घरात असतानाच चोरट्यांनी डाव साधला आणि ते घरात घुसले. त्यांच्याकडे बंदुक होती, जी श्रीवास्तव यांच्या पत्नीवर रोखण्यात आली होती. तेव्हाच अंतरा, म्हणजेच त्यांची लेक बेडरूममध्ये आली आणि तिथून तिनं वडिलांसह पोलिसांनाही फोन केला.
इतकंच नव्हे, तर बेडरुमच्या खिडकीतून तिनं वॉचमनला इशारा करत पोलिसांना फोन करण्यास सांगितलं. यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी श्रीवास्तव यांच्या पत्नीसह त्यांच्या मुलीची चोरांच्या तावडीतून सुटका केली. घरावर ओढावलेलं दरोड्याचं संकटही यावेळी टळलं.
समयसूचकता आणि शौर्याची अनोखी सांगड घालत अंतरानं केलेल्या या कामगिरीची दखल केंद्रानंही घेतली. 2006 मध्ये तिचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कारानं गौरव करण्यात आला.
ती सध्या काय करते? (Raju Srivastav Daughter)
फ्लाइंग ड्रीम एंटरटेनमेंट प्राइवेट लिमिटेडमध्ये अंतरानं सहाय्यक निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून काम पाहिलं आहे. सध्या मात्र आपल्या कामापासून दूर राहत तिनं संपूर्ण लक्ष वडिलांच्या प्रकृतीकडे दिलं आहे. जगण्या-मरण्याच्या या लढाईतून आपल्या वडिलांनी जिंकूनच बाहेर पडावं, अशीच प्रार्थना ती करत आहे.