मुंबई : मॉडेलिंग क्षेत्रात अनेकदा सौंदर्याच्या विविध निकषांना अंदाजात घेतलं जातं. अशा काही निकषांमध्ये मग बदलणाऱ्या दर दुसऱ्या व्यक्तीनुसार सौंदर्याची परिमाणं बदलू लागतात. कोणासाठी वर्ण, कोणासाठी रेखीवपणा, कोणासाठी सुडौल बांधा, कोणासाठी स्थुलता तर कोणासाठी सुंदर नसणं म्हणजेसुद्धा सौंदर्य असतं. मुळात ही संकल्पना आता बरीच बदलू लागली आहे. पण, या साऱ्यामध्येही एक अशी सौंदर्यवती आहे जिला तिच्या सावळ्या वर्णामुळे अनेकांचे टोमणे ऐकावे लागत होते.
सावळ्या वर्णामुळे अनेकांची बेलणी ऐकणारी ती म्हणजे अपूर्वा सोनी. राजस्थानमध्ये लहानाची मोठी झालेली अपूर्वा जयपूर महाविद्यालयात आली तेव्हा मॉडेलिंग जगताशी तिचा संपर्क आला. राजस्थानमध्ये वर्णावरुन जिथे तिला बरंच काही ऐकावं लागत होतं, तेच दिल्लीमध्ये मात्र तिच्या वर्णाची, रुपाची प्रशंसा झाली.
आपल्या याच अनोख्या प्रवासाविषयी सांगताना अपूर्वा म्हणते, 'मी कधी विचारही केला नव्हता की या क्षेत्रात येण्याची संधी मला मिळेल. दिल्लीत आल्यानंतर एजेन्सी, मॉडेलिंग कोऑर्डिनेटर आणि काही डिझायनर यांची नजर माझ्यावर पडली. त्यांना माझा वर्ण आणि चेहऱ्यावरील रेखीवपणा आवडला. पुढे जाऊन मला या क्षेत्रात कामही मिळू लागलं होतं.'
२०१४ मध्ये तिने 'मिस जयपूर' आणि 'मिस राजस्थान' असे किताब जिंकले. 'इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल' या रिऍलिटी शोच्या तिसऱ्या पर्वातही ती सहभागी झाली होती. सध्याच्या घडीला मॉडेलिंग विश्वात नावारुपास आल्यानंतर आता अपूर्वा बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.
रुपेरी झगमगाटाच्या या दुनियेत ती तिचं वेगळं स्थान प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत आहे. नुकतंच तिने एका वेब सीरिजसाठीचं चित्रीकरणही पूर्ण केलं. जी येत्या काळात एका प्रसिद्ध व्यासपीठावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या काळात चांगल्या चित्रपटाचा प्रस्ताव मिळाल्यास तो स्वीकारत चित्रपट अभिनेत्री म्हणून कारकीर्द घडवण्याचा तिला मानस आहे.