मुंबई : गरोदरपणादरम्यानचं सुंदर फोटोशूट म्हणू नका किंवा त्यादरम्यानच्या काळात योगसाधनेच्या माध्यमातून इतर महिलांना काही बाबतीत प्रोत्साहन देणं म्हणू नका. अभिनेत्री समीर रेड्डी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांच्याच भेटीला येत आहे. मुख्य म्हणजे काहींसाठी ती एक अभिनेत्री आहे, काहींसाठी मैत्रीण, काहींसाठी महत्त्वाच्या टीप्स देणारी एक महत्त्वाची व्यक्ती. पण, आपल्या चिमुकल्या मुलीसाठी समीरा एक आई असण्यासोबत आतापासूनच एक प्रेरणास्त्रोचही ठरत आहे.
काही महिन्यांपूर्वीच समीराने एका मुलीला जन्म दिला. ज्यानंतर त्याच मुलीला घेऊन समीर आता काही वळणवाटांवर निघाली आहे. या वळणवाटा असण्यापेक्षा डोंगरवाटा आहेत, असंच म्हणावं लागेल. कारण, दोन महिन्यांच्या मुलीला घेऊन समीराने कर्नाटकातील सर्वात उंच ट्रेक करण्याचं धाडस केलं आहे. या ट्रेकमध्ये पाचशे पायऱ्यांचं अंतर उरलेलं असताना मात्र समीराला मध्येच थांबावं लागलं. श्वास घेण्यात काही अडचणी आल्यामुळे तिला हा ट्रेक पूर्ण करता आला नाही. पण, तरीही मुल्यानागिरी पर्वत अर्ध्यापर्यंत का असेना, सर केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.
इन्स्टाग्रामवर खुद्द समीरानेच तिचा एक व्हिड़िओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये ती या पर्वतावरुन दिसणारा कर्नाटक सर्वांना दाखवत आहे. तर, आपण पुढे जाणार नसल्य़ाचंही सांगत आहे. आपल्याला मातृत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अनेक महिलांचे मेसेज येत असल्याचं सांगत आपल्यामुळे इतरांना भटकंतीची प्रेरणा मिळत असल्याचं पाहण्याची भावना अतिशय आनंददायी असल्याचं तिने या व्हिडिओसोबत लिहिलेल्या कॅप्शनमधून व्यक्त केली आहे.
समीराचा हा उत्साह आणि एकंदरच आयुष्याकडे पाहण्याचा तिचा सकारात्मक दृष्टीकोन खऱ्या अर्थाने अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे, असं म्हणायल हरकत नाही. ही झाली कर्नाटकातील सर्वात उंच शिखराची गोष्ट. आता समीराच्या भटकंतीच्या यादीतील पुढचं ठिकाण किंवा मग मुलीसोबत करायची कोणती अफलातून गोष्ट समोर येते हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.