मुंबई : प्रेम ही एक अशी भावना आहे, जी अनेकदा तुम्हाला जीवनात इतक्या उंचीवर नेते की विचारून सोय नाही. किंबहुना हेच प्रेम तुम्हाला अनेकदा त्याच उंचीवरून खाली पाडण्यासही कारणीभूत ठरू शकतं.
प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच आपलं नातं हे एका सुरेख वळणावर येऊन त्याला सर्वांचीच स्वीकृती मिळावी असं वाटत असतं.
पण, काहींच्या नशिबात मात्र प्रेमात मिळणारं हे यश कधीच येत नाही. अनेकदा प्रेम असे दिवसही दाखवतं जे आयुष्यभराची शिकवण देऊन जातात.
90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिनंही असाच अनुभव घेतला.
तिनं ज्या व्यक्तीवर प्रेम केलं, त्याच्यासोबतच्या नात्यामुळं प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच मोठी शिकवण मिळाली.
मीनाक्षीला पहिल्यांदाच पाहिलं जेव्हापासूनच गायक कुमार सानू तिच्या प्रेमात पडले होते.
अनेकदा हे एकरतर्फी प्रेम असल्याचं म्हटलं गेलं तर काहींच्या मते मीनाक्षी आणि कुमार सानू हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.
हे नातं या दोघांच्याही जीवनाला कलाटणी देणारं ठरलं. कारण मीनाक्षीवर प्रेम करणारे सानू विवाहित होते. त्यांच्या या नात्यामुळं पत्नीसोबतच्या नात्यात मात्र दुरावा आला.
पहिल्या पत्नीशी सानू यांचा घटस्फोट झाला. तिथे मीनाक्षीनं मात्र करिअरच्या अतिशय महत्त्वाच्या वळणावर असताना त्यांच्यापासून दुरावा पत्करला आणि लग्न करत ती परदेशात स्थायिक झाली.
मीनाक्षी आणि कुमार सानू यांच्या नात्यात तिसऱ्याच व्यक्तीला वेदनांचा सामना करावा लागला होता.
प्रेम एकतर्फी असो किंवा दोन्ही व्यक्तींचा एकमेकांवर जीव असो. यामध्ये जेव्हा तिसरा व्यक्ती असतो तेव्हा कोणा एकाचा प्रेमभंग चुकवता येत नाही.