मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री, भाजपा खासदार आणि अभिनेता अनुपम खेर यांची पत्नी किरण खेर आज त्यांचा ६४वा वाढदिवस साजरा करत आहे. १४ जून १९५५ मध्ये पंजाबमधील चंडीगढमध्ये एका सिख कुटुंबात किरण खेर यांचा जन्म झाला. किरण खेर यांनी आपल्या करियरची सुरुवात थिएटरमधील अभिनयापासून केली होती. पंजाबमधून त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलं.
पंजाबमध्ये काही काळ काम केल्यानंतर त्या मुंबईत दाखल झाल्या. मुंबईत आल्यानंतर त्यांच्या करियरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. किरण यांनी १९९६ मध्ये अमरीश पुरी यांच्यासोबत श्याम बेनेगल यांच्या 'सरदारी बेगम' मध्ये भूमिका साकारली आणि या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना स्पेशल जूरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर आलेल्या ऋतुपर्णा घोष यांच्या 'बैरीवाली' या चित्रपटात त्यांनी कामं केलं. 'बैरीवाली'मधील भूमिकेसाठी किरण यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला होता.
२००२ साली आलेल्या संजय लीला भंन्साळी यांच्या 'देवदास'मधून किरण यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्या एका परफेक्ट आईच्या भूमिकेसाठी ओळखू जाऊ लागल्या. या चित्रपटात किरण यांनी अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या आईची भूमिका साकारली होती.
किरण खेर अभिनेत्री, राजकारणी याशिवाय त्या उत्कृष्ट बॅटमिंटनपटूही होत्या. दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण यांच्यासोबत किरण खेर यांनी राष्ट्रीय पातळीवर बॅटमिंटन स्पर्धा खेळल्या आहेत.
किरण खेर यांनी अनुपम खेरसोबत दुसरं लग्न केलं आहे. त्यांचं पहिलं लग्न व्यावसायिक गौतम बेरीसोबत झालं होतं. परंतु काही वर्षांतच ते दोघे वेगळे झाले. त्याचदरम्यान अनुपम खेर यांचादेखील पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर अनुपम खेर आणि किरण खेर यांनी १९८५ मध्ये लग्न केलं. किरण खेर यांना सिकंदर हा एक मुलगाही आहे.
अनुपम खेर आणि किरण आधीपासून एकमेकांना ओळखत होते. कॉलेज थिएटर दरम्यान त्यांची ओळख झाली होती. परंतु आपापल्या करियरसाठी अनुपम आणि किरण यांचे मार्ग वेगवेगळे झाले. किरण यांनी १९७९ मध्ये गौतम बेरीशी लग्न केलं. लग्नानंतर अनुपम आणि किरण यांची पुन्हा दुसऱ्यांदा भेट झाली. 'नादिरा बब्बर यांच्या शोसाठी कोलकत्तामध्ये दोघांची भेट झाली आणि त्याचवेळी अनुपम यांनी किरण खेर यांना लग्नासाठी विचारलं' असल्याचं किरण यांनी एका मुलाखतीत सांगतिलं.
किरण खेर यांनी मंगल पांडे, रंग दे बसंती, वीर-जारा, देवदास, कर्ज, हम, मैं हूं ना, दोस्ताना, सरदारी बेगम, कभी अलविदा ना कहना, फना, एहसास, अजब गजब लव, कमबख्त इश्क, खूबसूरत यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.