बॉलिवूडच्या 'भिकू म्हात्रे'वर आलेली इतरांकडे गयावया करण्याची वेळ; भाडं भरण्यासाठीही नव्हते पैसे तेव्हा...

Manoj Bajpayee : एक कलाकार म्हणून मनोज खूप मोठा झाला. त्याच्यातला साधेपणा प्रेक्षकांची मनंही जिंकत राहिला. पण आतापर्यंतचा त्याचा हा प्रवास सोपा नव्हता... 

Updated: Jan 17, 2023, 10:15 AM IST
बॉलिवूडच्या 'भिकू म्हात्रे'वर आलेली इतरांकडे गयावया करण्याची वेळ; भाडं भरण्यासाठीही नव्हते पैसे तेव्हा... title=
Bollywood Actor Manoj Bajpayee once faced economic crisis asked for a work to ram gopal varma

Manoj Bajpayee : काही कलाकारांची ओळख ही त्यांच्या कामानं असते. अशाच कलाकारांमधील एक नाव म्हणजे अभिनेता मनोज बाजपेयीचं. कलाजगतातील काही सर्वोत्तम कलाकारांच्या यादीत मनोजचं नाव घेतलं जातं. चित्रपट म्हणू नका किंवा मग वेब सीरिज, मनोज बाजपेयीनं त्याच्या वाट्याचा आलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. जीव ओतून काम केलं आणि प्रत्येक पात्र रुपेरी पडद्यावर जीवंत केलं. (Satya Movie) 'सत्या' या चित्रपटामध्ये त्यानं साकारलेला 'भिकू म्हात्रे' (Manoj Bajpayee as bhiku mhatre) कुणीही विसरु शकलेलं नाही. पैसा, प्रसिद्धी आणि चाहत्यांचं प्रेम, अमाप काम हे सारंकाही मनोजला मिळालं. पण, त्याचा इथपर्यंतचा प्रवास फारसा सोपा नव्हता. 

राम गोपाल वर्मा आणि मनोजची गयावया... तेव्हा नेमकं काय घडलेलं?

अष्टपैलू अभिनेता आणि समाजोपयोगी कामांमध्ये हिरीरिनं पुढाकार घेणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या एका मुलाखतपर कार्यक्रमात नुकतीच मनोजनं हजेरी लावली होती. यावेळी त्यानं बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. आपले संघर्षाचे दिवस आठवत त्यानं अशा आठवणींना उजाळा दिला, ज्या फार क्वचित व्यक्तींनाच ठाऊक असाव्यात. 

'दौड' (Daud) या चित्रपटासाठी मनोज राम गोपाल वर्माला (Ram Gopal Varma) भेटायला गेला. त्यांच्या एका चित्रपटामध्ये कन्नन अय्यर यांनी लिहिलेल्या 3-4 लहान भूमिका होत्या. मनोज भेटीच्या ठिकाणी पोहोचला आणि त्याला पाहून, 'तू कोणत्या चित्रपटामध्ये काम केलं आहेस का?' असा प्रश्न राम गोपाल वर्मानं विचारला. ज्यावर उत्तर देत, मनोजनं आपण 'बँडिड क्वीन' (bandit queen) या चित्रपटात काम केल्याचं सांगितलं. 

हेसुद्धा वाचा : Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस, काय आहे प्रकरण जाणून घ्या

हा आपला आवडता चित्रपट असल्याचं सांगत पुढे राम गोपाल वर्मानं त्याच्या भूमिकेविषयी विचारलं. आपली भूमिका फार मोठी नव्हती, सायलेंट रोल होता असं सांगत 'मान सिंग' साकारल्याचं तो म्हणाला. हे ऐकताच राम गोपाल वर्मा ताडकन उभा राहिला. मी तुला गेल्या चार वर्षांपासून शोधतोच असं म्हणत रामूच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. 

घरभाड्यासाठीचेही पैसे नव्हते... मग पुढे.... 

बस्स, मग काय? मनोजनं साकारलेल्या भूमिकांविषयीची माहिती मिळताच राम गोपाल वर्मानं 'दौड' बाजूला सारत दुसऱ्याच एका चित्रपटाची ऑफर त्याला दिली. पण त्यावेळी पैशांची चणचण असल्यामुळे, 'तो चित्रपट होईल तेव्हा होईल पण, मला या चित्रपटात काम करुद्या. कारण मला पैशांची प्रचंड गरज आहे' असं म्हणत मनोजनं गयावया करण्यास सुरुवात केली, हात पसरले. राम गोपाल वर्माही तयार झाला. आपण यासाठी 30 हजार रुपये देऊ असं तो मनोजला म्हणाला. ही रक्कम त्याच्यासाठी जास्तच होती, इतक्यात त्याच्या घराचं वर्षभराचं भाडं भरता येणार होतं. मनोजच्या आयुष्याला कलाटणी देणारा आणि बॉलिवूडच्या 'भिकू म्हात्रे'ला जन्माला घालणारा हाच तो क्षण...