मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या धोकादायक व्हायरसची झळ सर्व सामान्य जनतेसह सेलिब्रिटींना देखील बसली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कोरोना व्हायरसवर मात केली आहे. आता 'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटीयाला करोनाची लागण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तिला करोनाची सौम्य लक्षणे जाणवत होते. तिला ताप देखील होता. त्यामुळे तिने कोरोना चाचणी करून घेतली होती. तिची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचं सांगण्यात आलं आहे.
सध्या तिच्यावर हैद्राबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याच्या चर्चा तुफान रंगत आहेत. मध्यंतरी तमन्ना भाटीयाच्या आई-वडिलांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले होते. खुद्द तमन्नाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.
गेल्या २४ तासांत ९४० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे देशात कोरोना या धोकादायक विषाणूमुळे मृत पावलेल्यांची संख्या १ लाख १ हजार ७८२वर पोहोचली आहे. सध्या देशात करोनाबाधितांची एकूण संख्या ६५ लाख ४९ हजार ३७४ इतकी आहे.