मुंबई : अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या पाठोपाठ आता अभिनेते अनुपम खेर यांच्या आईला देखील कोरोनाची लागण झाली आहे. दुलारी असं अनुपम खेर यांच्या आईचं नाव आहे. त्यांच्यासोबतच अनुपम खेर यांचा भाऊ, भावाची बायको आणि भावाची मुलगी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता कोरोनाने कलाकारांच्या जीवनात देखील प्रवेश केला आहे. अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. एक व्हिडिओ शेअर केला आहे.
This is to inform all that my mother Dulari is found Covid (Mildly). We have admitted her into Kokilaben Hospital. My brother, bhabhi & niece inspite of being careful have also tested mildly positive.I got myself tested as well & I have tested negative. @mybmc is informed.! pic.twitter.com/EpjDIALft2
— Anupam Kher (@AnupamPKher) July 12, 2020
या व्हिडिओत अनुपम खेर सांगतात की, माझी आई तुम्ही 'दुलारी' या नावाने ओळखता. ती गेल्या काही दिवसांपासून जेवण जेवत नव्हती. तिला अशक्तपणा आला होता. त्यामुळे तिला डॉक्टरकडे नेण्यात आलं. काही चाचण्या केल्या त्याबरोबरच कोविड-१९ ची देखील टेस्ट केली. आईची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तिच्यावर कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आईसोबतच मी आणि भाऊ असतो. त्यामुळे आम्ही देखील आमची चाचणी करून घेतली आहे. माझे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून माझ्या भावाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे त्याची पत्नी आणि मुलीचा देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. त्यांच्या कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत.
अनुपम खेर आणि त्याचे भाऊ राजू खेर अनेकदा आपल्या आईसोबतचे व्हिडिओ शेअर करत असतात. सोशल मीडियावर या तिघांची धम्माल मस्ती सुरू असते. अनुपम खेर यांच्या आईचं वय जास्त आहे. त्यामुळे त्या लवकरच बऱ्या होऊन घरी येतील अशी प्रार्थना सगळे चाहते देवाकडे करत आहेत.