नेटफ्लिक्सवर (Netflix) पुरुष सेक्स वर्कवर आधारित मालिका त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये मानव कौल (Manav Kaul) आणि तिलोत्तम शोम (Tillotama Shome) मुख्य भूमिकेत आहेत. तिलोत्तमा शोमने लस्ट स्टोरीज 2, अंग्रेजी मीडियम, हिंदी मीडियमसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान नुकतंच तिने एका मुलाखतीत तिने बोल्ड विषयांवर चर्चा केली. लैंगिक शिक्षणाशी संबंधित अनेक प्रश्न मी माझ्या आई-वडिलांना विचारत असे असं यावेळी तिने सांगितलं. दरम्यान यावेळी तिने दिल्लीत तिची कशाप्रकारे छे़ड काढण्यात आली होती याचा धक्कादायक अनुभव सांगितला. तसंच 6 तरुणांपासून वाचण्यासाठी आपण एका कारमध्ये लिफ्ट घेतली असता चालकानेही कशाप्रकारे अश्लील कृत्य केल्याचं तिने सांगितलं.
तिलोत्तमाने हॉटर फ्लाय मेल फेमिनिस्टला दिलेल्या मुलाखतीत महिलांशी संबंधित अनेक प्रश्नांवर भाष्य केलं. लैंगिक शिक्षणाबद्दल ती म्हणाली की, "माझे आई-वडील फार नॉन जजमेंटल आहेत. मी त्यांना काहीही विचारु शकत होती. जसं की, सेक्स कसा करतात, मुलं कशी होतात?. मी त्यांना नाही तर आणखी कोणाला विचारणार. ते माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत असत".
आपल्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेचा उलगडा करताना तिने सांगितलं की, तेव्हा हिवाळ्याचे दिवस होते. संध्याकाळ झाल्याने अंधार पडू लागला होता. मी बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभी होते. त्याचवेळी एक कार तिथे य़ेऊन थांबली. त्यातून 6 तरुण खाली उतरले. कार बस स्टॉपवर का थांबली हे आधी मला समजलं नाही. मी फार संशय घेत असल्याने मला काहीतरी गडबड आहे असं वाटलं आणि थोडी मागे हटले.
"यानंतर ते तरुण अश्लील कमेंट्स करु लागले. मी त्यांच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करु लागले. मी रस्त्याच्या मधोमध उभी राहून लिफ्ट मागू लागली. तितक्यात एक कार थांबली, त्यावर मेडिकलचं चिन्ह होतं. मला वाटलं की ही योग्य कार आहे. मी पुढच्या सीटवर बसले. तितक्यात चालकाने त्याच्या पँटची चेन उघडली आणि माझा हात पकडला. त्याने माझा हात जबरदस्ती त्याच्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला असता मी तो जोरात झटकला. यामुळे चालक घाबरला आणि त्याने गाडी थांबवून मला खाली उतरण्यास सांगितलं," असा धक्कादायक अनुभव तिने सांगितला.
तिलोत्तमाने पुढे सांगितलं की, "यानंतर मी माझ्या घऱी गेले नाही. मला आई-वडिलांना उगाच त्रास द्यायचा नव्हता. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले. माझ्यासाठी ही घटना फार धक्कादायक आणि भीतीदायक होती".