Pandemic News : जगावर कोरोनाचं संकट ओढावलं आणि त्या सावटाखाली संपूर्ण जगानं प्रचंड आव्हानांचा सामना केला. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला संसर्गाला महामारी ठरवत जगापुढं असणाऱ्या संकटाविषयी सतर्क करण्यासा 4 वर्षे उलटली. जागतिक महामारी म्हणून अनेकांनाच धडकी भरवणाऱ्या कोरोना संसर्गाची तीव्रता आता कमी झाली असली तरीही हे संकट अद्याप पूर्णपणे टळलं नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. किंबहुना येत्या काळात जगावर आणखी एका महामारीचं संकट कोणत्याही क्षणी ओढावू शकतं असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
Sky News च्या वृत्तानुसार UK मधील साथरोग तज्ज्ञांनी जगावर घोंगावणाऱ्या या संकटाबद्दलची चिंता व्यक्त केली असून, येत्या काळात प्राण्यांद्वारे माणसाला होणाऱ्या विषाणू संसर्गामुळं धोका वाढून त्याचं रुपांतर महामारीमध्ये होण्याची भीती व्यक्त केली आहे.
'आणखी एक महामारी या जगापुढं उभीच आहे. दोन वर्षे, 20 वर्षे किंवा कधीही आणि कितीही काळासाठी ती टिकू शकते. पण, अशा परिस्थितीत आपण हतबल होऊन चालणार नाही. आपण महामारीशी दोन हात करण्यासाठी सुसज्ज असणं गरजेचं आहे', असं Dr. Nathalie MacDermot म्हणाले. लंडनमधील किंग्स महाविद्यालयामध्ये साथरोग विषयावर व्याख्याते असणाऱ्या मॅकडर्मोट यांनी, 'पुन्हा त्यागासाठी तयार राहा' असाही थेट इशारा दिला.
जागतिक तापमानवाढ, जंगलतोड या दोन महत्त्वाच्या कारणांमुळं प्राण्यांवाटे माणसांमध्ये अनेक विषाणूंचा संसर्ग पसरण्याचा धोका वाढत असल्याचं अभ्यासकांनी स्पष्ट केलं आहे.
Dr MacDermott यांच्या मते अॅमेझॉन आणि आफ्रिकेतील मोठ्या भागात वृक्षतोड झाल्यामुळं प्राणी, किडे, किटकांच्या अनेक प्रजाती मानवी वस्तीच्या दिशेनं कूच करू लागल्या आहेत. सध्या या मानवनिर्मित परिस्थितीतून आपण एका मोठ्या संकटासाठीची वातावरणनिर्मिती करत असल्याचा थेट इशारा त्यांनी दिला.
जागतिक तापमानवाढीमुळं चिकनगुनिया, डेंग्यूसह क्रिमियन काँगो हेमोरेजिक फिव्हर (CCHF) सारख्या आजारांचा धोका आणखी फोफावू शकतो. किंबहुना युरोपच्या काही भागांमध्ये पहिल्यांदाच या आजारांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. थोडक्यात कोरोना महामारीनं जगाला धडकी भरवल्यांनंतर अनेक कारणांमुळं काही महामारी जगाची चिंता आणखी वाढवणार हे अटळ.