St Martin Island of Bangladesh : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून पळ काढल्यानंतर पहिल्यांदा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि बांगलादेशमध्ये राजीनामा का दिला? याची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी बांगलादेशमधीन गृहयुद्धाला अमेरिका जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. सेंट मार्टिन बेट अमेरिकेच्या ताब्यात न दिल्याने त्यांना सत्तेतून हद्दपार व्हावं लागल्याचा आरोप केलाय. मला मृतदेहांचा ढीग बघावा लागू नये म्हणून मी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला, असं शेख हसीना यांनी म्हटलं आहे.
मी अमेरिकेला सेंट मार्टिन बेट दिलं असतं आणि बंगालच्या उपसागरावर राज्य करू दिलं असतं तर मी सत्तेत राहू शकले असते. विद्यार्थ्यांच्या मृतदेहांवर चढून त्यांना सत्ता मिळवायची होती पण मी ते होऊ दिलं नाही. यामुळे मी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला, असं शेख हसीना यांनी म्हटलं आहे. मी माझ्या देशातील नागरिकांनाला विनंती करते की, अशा अतिरेक्यांच्या फंदात पडू नका, असं शेख हसीना यांनी म्हटलं आहे. आशा सोडू नका. मी लवकरच परत येईन. मी हरले पण बांगलादेशची जनता जिंकली, असं म्हणत शेख हसीना यांनी बांगलादेशच्या जनतेला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेख हसीना यांनी उल्लेख केलेलं सेंट मार्टिन बेट आहे तरी काय? अमेरिकेला हे बेट का पाहिजे? जाणून घेऊया...
सेंट मार्टिन बेट हे बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात एक खुप लहान (फक्त 3 चौरस किमी) बेट आहे. टेकनाफ द्वीपकल्पाचा काही भाग नंतर पाण्याखाली गेल्यानंतर हे बेट बांगलादेशपासून वेगळं झालं. ब्रिटीश राजवटीत चितगावच्या तत्कालीन उपायुक्तांच्या नावावरून या बेटाला सेंट मार्टिन बेट असे नाव देण्यात आलं होतं. 18 व्या शतकात अरब व्यापाऱ्यांनी सर्वप्रथम हे बेट वसवलं होतं. जझीरा असं याचं मुळ नाव होतं. 9 किलोमीटर लांब आणि 1.2 किलोमीटर रुंद अशा या बेटावर चीन आणि अमेरिकेचं लक्ष्य आहे. त्याला कारण आग्नेय आशियाचं भू राजकीय महत्त्व..!
सेंट मार्टिन बेटाला सामरिकदृष्ट्या महत्त्व आहे. जर आग्नेय आशियावर ताबा ठेवायचा असेल तर सेंट मार्टिन बेटासारखे चंचुमार्ग शोधावे लागतात. या बेटावर अमेरिका विमानतळ तयार करून चीन आणि कदाचित भारतावर नियंत्रण करण्याचा प्रयत्नात आहे. अमेरिका या बेटावर जहाज बांधणी आणि एअरबेस देखील तयार करू शकतो. त्यामुळे चीन देखील अमेरिकेच्या या हालचालीमुळे भयभीत आहे. आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या देखील हे बेट महत्त्वाचं असल्याने चीनचा देखील या बेटावर डोळा होता. त्यामुळे बांगलादेशमधील सरकार उलथवण्याचे प्रयत्न चीनने केले होते.
सेंट मार्टिन बेटावर जाण्याचा एकमेव मार्ग समुद्रमार्गे आहे. कॉक्स बाजार आणि टेकनाफ येथून बोटी आणि फेरी जातात. हा बांगलादेशचा सर्वात दक्षिणेकडील भाग आहे पण इथे अजूनही वीजपुरवठा होत नाही. इथले लोक जनरेटरवर काम चालवतात. इथं काँक्रिटचे रस्ते आहेत, पण इथं अजूनही हात रिक्षा चालवली जाते.