मुंबई : दहशतवाद आणि दहशतवादी संघटना या विषयांचा उल्लेख झाल्यावर एक नाव पुढे येतं ते म्हणजे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याचं. १९९९ मध्ये भारताच्या कचाट्यातून सुटलेल्या या दहशतवाद्याने वारंवार त्याच्या कुटनितीने भारतावरच वारंवार निशाणा साधत अनेक दहशतवादी कारवाया केल्या. त्याच्या याच कृत्यांमुळे आता साऱ्या जगाच्या निशाण्य़ावर तो आला असून, थेट संयुक्त राष्ट्रात अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या राष्ट्रांकडूनही संयुक्त राष्ट्रांमध्ये त्याच्या नावाचा समावेश आंतरराष्ट्रीय दहशतवद्यांच्या यादीत करावा याविषयीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच अझहर आणि त्याला आर्थिक पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानची कोंडी होणार आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रातांत जन्मला आलेला मौलाना मसूद अझहरला १९९४ मध्ये अझहरला मध्ये गजाआड करण्यात आलं होतं. त्याची सुटका करण्यासाठी त्याच्याच साथीदारांनी २४ डिसेंबर १९९९ला इंडियन एअरलाईन्सच्या IC 814 या विमानाचं अपहरण केलं होतं. अपहरण करून हे विमान अफगाणिस्तानात कंधारमध्ये नेण्यात आलं. विमानात असणाऱ्या सर्व प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी म्हणून भारताकडून एकूण ३ दहशतवाद्यांना सोडण्यात. त्यात मसूद अझहरचाही समावेश होता.
मार्च २००० मध्ये अझरने जैश ए मोहम्मदची स्थापना केली. भारताच्या संसदेवरील झालेला हल्ला, जम्मू काश्मीरच्या विधानसभेवरील हल्ला, पठाणकोटच्या वायूसेना तळावरील हल्ला आणि नुकताच झालेला पुलवामा दहशतवादी हल्ला या सर्व हल्यांचे कट मसूद अझहरने रचले होते. दहशतवादाच्या त्याच्या क्रूर कृत्यांनी साऱ्या जगाला वारंवार हादरा दिला आहे.
अझहरने सुरु केलेल्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेने आजवर अनेक दहशतवादी कारवायां करत कित्येक निष्पापांचे बळी घेतले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती, इंग्लंड, अमेरिका, आणि संयुक्त राष्ट्रांनी 'जैश'ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. पण पाकिस्तानकडून मात्र या संघटनेला आर्थिक पाठबळ असल्याची बाब वारंवार समोर आली. शिवाय अझहरला वाचवण्यासाठी पाकिस्तानला चीनचीही मदत मिळत गेली. परिणामी, त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव अनेकदा मांडला गेला खरा. पण प्रत्येकवेळी चीननं त्यावर आक्षेप नोंदवला. संयुक्त राष्ट्रांमध्ये चीनने त्यांना मिळालेल्या नकारधिकाराचा वापर करून हा प्रस्ताव फेटाळण्याचं सत्र सुरू ठेवलं होतं.
जम्मू- काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात असणाऱ्या अवंतीपोरा येथे जैश-ए-मोहम्मदच्याच दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना प्राण गमवावे लागले. या क्रूरतेचा साऱख्या जगातून निषेध करण्यात आला. सोबतच पुन्हा एकदा भारताकडून संयुक्त राष्ट्रात मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी करण्यात आली.