मुंबई : Afghanistan crisis : तालिबानने (Taliban) ब्रिटिश (Britain) सैन्याला अफगाणिस्तानातून (Afghanistan) बाहेर पडण्याची मुदत दिली आहे. दहशतवादी संघटनेने म्हटले आहे की, जर ब्रिटीश सैन्य एका आठवड्याच्या आत माघारी परतले नाही तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. काबूल विमानतळ सध्या अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्याच्या ताब्यात आहे. दोन्ही देश आपल्या नागरिकांना तसेच अफगाण लोकांना सुरक्षित परिस्थितीत बाहेर काढत आहेत. ज्या प्रकारची परिस्थिती आहे, ते पाहता एका आठवड्यात बचावकार्य पूर्ण करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत तालिबानच्या डेडलाइनमुळे ब्रिटनची चिंता वाढली आहे.
'द सन' च्या अहवालानुसार, तालिबानने धमकी दिली आहे की, जर ब्रिटिश सैन्याने एका आठवड्याच्या आत काबूल विमानतळ सोडले नाही तर त्यांना युद्धासाठी तयार राहावे लागेल. दहशतवादी संघटनेने म्हटले आहे की, एक मिनिटाचाही विलंब भयंकर संघर्षाला कारणीभूत ठरु शकतो. त्याचवेळी, जी 7 बैठकीदरम्यान, ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन आज अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांची भेट घेतील. जॉन्सन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अफगाणिस्तानातून माघार घेण्याची 31 ऑगस्टची मुदत वाढवण्यास सांगतील, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढता येईल.
तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिकेने मुदत वाढवण्यास नकार दिला तर पुढील सात दिवस फक्त अफगाणिस्तानातून सैनिकांना बाहेर काढण्यासाठी जातील. अशा स्थितीत देश सोडून जाण्याच्या आशेने विमानतळावर पोहोचलेले अफगाणी निराश होतील. दरम्यान, ब्रिटनने बचाव मोहीम तीव्र केली आहे. त्याची अनेक विमाने काबूलला प्रदक्षिणा घालत आहेत, जेणेकरुन शक्य तितक्या लोकांना तेथून बाहेर काढता येईल.
अमेरिकेने अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घेण्यासाठी 31 ऑगस्टची मुदत दिली होती, पण त्याआधीच तालिबानने ताबा घेतला. आता अफगाणिस्तानातून बाहेर पडणाऱ्या लोकांची गर्दी ज्या प्रकारे विमानतळावर पोहोचत आहे हे लक्षात घेऊन ही मुदत खूप कमी आहे. अशा परिस्थितीत तालिबानच्या धमकीमुळे परिस्थिती आणखी चिंताजनक झाली आहे. जगभरातील सुमारे 230 विमाने सध्या बचाव मोहिमेत गुंतलेली आहेत. ज्यामध्ये डेल्टा, अमेरिकन एअरलाइन्स आणि युनायटेड एअरलाइन्सच्या 18 नागरी विमानांचा समावेश आहे.
सध्या, सुमारे 1800 ब्रिटिश नागरिक आणि 2500 अफगाणी जे त्यांना मदत करतात ते काबूल विमानतळावर विमानात जाण्याची वाट पाहत आहेत. 14 ऑगस्टपासून अमेरिका आणि ब्रिटनने अफगाणिस्तानातून सुमारे 37,000 लोकांना बाहेर काढले आहे, परंतु अजून बरेच काम बाकी आहे. अमेरिकेने मुदत वाढवण्याची मागणी मान्य केली तर तालिबानची भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.