Corona : संघर्षाच्या काळात इटलीला अखेर एक दिलासा

वाचा नेमकं काय झालं.....

Updated: Mar 24, 2020, 05:34 PM IST
Corona : संघर्षाच्या काळात इटलीला अखेर एक दिलासा
छाया सौजन्य- रॉयटर्स

मिलान : सुरुवातीच्या काळात चीनमध्ये फोफावणारा कोरोना व्हायरस पाहता संपूर्ण जगभरात थैमान घालू लागला. आता तर, चीनला मागे टाकत इटलीमध्येच कोरोनाचा मोठ्या प्रमाणात विळखा बसल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काळात काहीसं दुर्लक्ष झाल्यामुळे कोरोना फोफावला आणि या राष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली. आतापर्यंत इटलीमध्ये कोरोनामुळे जवळपास ६०७७ जणांचा मृत्यू झाला आहे. पण, अडचणीच्या या प्रसंगातही इटलीसाठी एक दिलासादायक माहिती समोर आल्याचं कळत आहे. 

सोमवारी इटलीमध्ये 601 नागरिकांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा हा आकडा सलग दुसऱ्या दिवशी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. सलग तिसऱ्.या दिवशी इटलीमध्ये सक्तीचं लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर काही अंशी आळा बसल्याचं पाहायला मिळत आहे. मृत्यूदरात घट होण्याचं हे प्रमाण असंच सुरु राहिल्यास येत्या काळाता कोरोनाचा संसर्गही कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

जाणकारांच्या म्हणण्यानुसार आता हीच एक बाब इटलीला दिलासा देणारी ठरु शकते. दरम्यान, कोरोनाची सुरुवात झालेल्या चीमध्ये सर्वप्रथम मृत्युचं थैमान पाहायला मिळालं. 

 

आता कुठे चीन कोरोनाच्या या वादळातून सावरत आहे, तोच इटलीमध्ये कोरोना फोफावत आहे. इतकंच नव्हे तर, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही चीनपेक्षा इटलीमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे हे सर्वच चित्र काहीसं चिंतेत टाकणारं आहे. आतापर्यंत जगभरात तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामधील एक लाखांहून अधिकांनांनी कोरोनाशी लढा दिला असून, त्यांना रुग्णालयातून घरीही पाठवण्यात आलं आहे. कोरोनामध्ये कित्येकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. या साऱ्यामध्ये सर्वच ठिकाणच्या प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरु केलं आहे. पण, त्यातही आता कोरोनावर यशस्वीपणे मात करण्यासाठी सर्व स्तरातील आणि सर्वच ठिकाणच्या नागरिकांनी सहकार्य करत स्वयंशिस्तीने वागण्याची प्रकर्षाने गरज आहे.