कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केलं म्हणून थेट पंतप्रधानांना ठोठावला दंड

कोरोना संसर्गाला थोपवण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध सर्वसामान्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंतच्या सर्व नागरीकांना समान असल्याचे या देशाने दाखवून दिले आहे.

Updated: Apr 10, 2021, 07:50 AM IST
 कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केलं म्हणून थेट पंतप्रधानांना ठोठावला दंड title=

ओस्लो : कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी थेट पंतप्रधानांना दंड ठोठावण्यात आला आहे. कोरोना संसर्गाला थोपवण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध सर्वसामान्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंतच्या सर्व नागरीकांना समान असल्याचे या देशाने दाखवून दिले आहे.

 
 नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारण्यात आला आहे.  पोलिसांच्या मते पंतप्रधानांनी कोरोनो प्रतिबंधक नियमांचे तसेच मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करीत, वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. 
 
 नार्वेमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. येथे आतापर्यंत एक लाखापेक्षा अधिक लोकांना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाला आहे.
 
 पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी मागील महिन्यात आपल्या 60 व्या जन्मदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी परिवारातील 13 जण उपस्थित होते. नॉर्वेमध्ये कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी फक्त 10 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी होती. पोलिसांच्या मते या पार्टीत सोशल डिस्टंन्सिंगचेही उल्लंघन करण्यात आले होते. 

नियम सर्वांसाठी समान

 पोलिसांच्या मते, कायदा सर्वांसाठी समान आहे. नियमांचे उल्लंघन करण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात येईल.