नवी दिल्ली : 'रेड प्लॅनेट' म्हणजेच मंगळ ग्रहावर आपणंही जावं असं अनेकांना वाटतं. जगभरातील अनेकजण मंगळवारी करण्यासाठी उत्साही आहेत. मंगळावर जाण्यासाठी भारतीय नागरिकांनी जोरदार तयारी केल्याचं पहायला मिळत आहे.
मंगळ ग्रहावर जाण्यासाठी १ लाख ३८ हजार ८९९ भारतीयांनी फ्लाईटचं तिकीटं बुक केली आहेत. या सर्व नागरिकांनी नासाच्या 'इनसाईट मिशन' (इंटेरिअर अक्सप्लोरेशन युसिंग सिस्मिक इन्वेस्टीगेशन्स, जीओडेसी अँड हीट ट्रान्सपोर्ट)च्या माध्यमातून आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे.
नासाचं हे 'इनसाईट मिशन' ५ मे २०१८ रोजी सुरु होणार आहे. ज्या नागरिकांनी मंगळ ग्रहावर जाण्यासाठी बुकिंग केलं आहे त्यांना नासातर्फे ऑनलाईन बोर्डिंग पास देण्यात येणार आहे.
मंगळावर जाण्यासाठी रजिस्ट्रेशन झालेल्या नागरिकांचं नाव सिलिकॉन चिपवर इलेक्ट्रॉनिक्स बीमच्या मदतीने कोरण्यात येणार आहे. चिपवर कोरण्यात आलेली अक्षरं ही केसाच्या एक हजाराव्या भागाहूनही अधिक पातळ असणार आहेत.
नासाच्या मते, मंगळ ग्रहावर जाण्यासाठी जगभरातील २४ लाख २९ हजार ८०७ नागरिकांनी अर्ज केले होते. तिकीट बुक करणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेतून ६ लाख ७६ हजार ७७३ नागरिकांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे. तर, चीनमधून २ लाख ६२ हजार ७५२ नागरिकांनी आपलं बुकिंग केलं आहे.
स्पेस एक्सपर्टच्या मते, मंगळ ग्रहावर जाण्यासाठी अमेरिकेतून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. पण, हा प्रतिसाद धक्कादायक नाहीये कारण हे मिशन अमेरिकेचंच आहे. पण, चीननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर असणं याला एक वेगळचं महत्व प्राप्त झालं आहे.