IED Blast in Pakistan: पाकिस्तानात दुचाकीवर IED लावून भरबाजारात घडवला स्फोट; 4 ठार

IED Blast in Pakistan: पाकिस्तानमधील (Pakistan) बलुचिस्तान (Balochistan) येथील बाजारात भीषण स्फोट (Blast) होऊन चौघे ठार झाले आहेत. एका दुचाकीवर आयईडी (IED) लावून हा स्फोट घडवण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून कठोर कारवाईची सूचना केली आहे.   

Updated: Feb 26, 2023, 02:51 PM IST
IED Blast in Pakistan: पाकिस्तानात दुचाकीवर IED लावून भरबाजारात घडवला स्फोट; 4 ठार title=

IED Blast in Pakistan: पाकिस्तानात (Pakistan) रविवारी सकाळी भीषण स्फोट (Blast) झाला. बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात एका बाजारात झालेल्या या स्फोटात चौघे ठार तर 10 जण जखमी झाले. बरखानचे पोलीस उपायुक्त अब्दुल्ला खोसो यांनी डॉन वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, राखनी मार्केट (Rakhni Market) परिसरात हा स्फोट झाला. एका दुचाकीवर आयईडी (IED) लावून हा स्फोट घडवण्यात आला. 

बरखानचे स्टेशन हाऊस अधिकारी (SHO) सज्जाद अफजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून तपास सुरु केला आहे. 

स्फोटानंतर सोशल मीडियावर काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये स्फोटाच्या ठिकाणी लोकांची प्रचंद गर्दी असून रक्तबंबाळ अवस्थेत जखमींना नेलं जात असल्याचं दिसत आहे. तसंच रस्त्यावर दुचाकी आणि भाज्या पडल्याचंही दिसत आहे. 

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर अब्दुल कुदूस बिजेन्जो यांनी या स्फोटाचा निषेध केला असून प्रशासनाला हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. निष्पापांची हत्या करणारे माणुसकीचे शत्रू आहेत अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 

"आपलं राक्षसी ध्येय पूर्ण करण्यासाठी दहशतवादी अस्थिरता निर्माण करत आहेत. पण आम्ही या देशविरोधी कारवाया यशस्वी होऊ देणार नाही," असं ते म्हणाले आहेत. सरकार दहशतवादविरोधी योजना आखेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जखमींना योग्य उपचार द्यावेत अशी सूचना त्यांनी केली आहे. पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनीही स्फोटाचा निषेध केला असून मुख्यमंत्र्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.